नांदेड एमआयडीसीत २२७ भूखंडांना उद्योगांची प्रतीक्षा; अनेक भूखंड वापराविना पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 03:30 PM2023-08-12T15:30:35+5:302023-08-12T15:31:11+5:30
भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही.
- रामेश्वर काकडे
नांदेड : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात शेकडो भूखंड रिकामे असून बहुतांश भूखंडांवर काही व्यावसायिकांनी वर्षानुवर्षांपासून ताबा घेतलेला आहे; परंतु अशा भूखंडांवर कोणताही उद्योग, व्यवसाय उभारलेला नसल्याने असे भूखंड अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम नांदेड एमआयडीसीत भूखंडाअभावी नवउद्योजकांच्या उद्योग उभारणीला ब्रेक लागला आहे.
जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी त्यांना औद्योगिक वसाहतीमध्ये विविध विकास कालावधीसाठी अल्पदरात रिकामे भूखंड शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतात. त्यावर बहुतांश उद्योजक उद्योग व्यवसाय सुरू करतात. मात्र, काही व्यावसायिकांकडून अनेक वर्षांपासून भूखंड आपल्या ताब्यात घेतल्यानंतरही कोणताच उद्योग व्यवसाय सुरू केलेला नाही. त्याचा परिणाम इच्छुक व्यावसायिकांचे नवउद्योग जागेभावी ठप्प झाले आहेत. भूखंड घेऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सदर जागेवर उद्योग व्यवसाय उभारला नसेल तर असे भूखंड परत घेतले जातात. एमआयडीसीतील अनेक व्यावसायिकांनी भूखंड करारावर घेतलेले आहेत; परंतु भूखंडाचा विकास कालावधी संपत आलेला असला तरी त्याचा बिल्डिंग प्लान तयार केलेला नाही. इमारतीचे बांधकामही केले नाही. त्याठिकाणी कोणती उद्योग व्यवसाय उभारला नाही.
रिकामे असलेले भूखंड
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत वाटपासाठी उपलब्ध असलेले रिकामे भूखंड याप्रमाणे. नांदेड २२, कृष्णूर १५० देगलूर, १८ कंधार ७, तर किनवट औद्योगिक वसाहतीत ३० भूखंड रिकामे आहेत. ८०० ते ९०० हेक्टर क्षेत्रात औद्योगिक वसाहत आहे.
धर्माबाद मारतळा भोकरमध्ये एमआयडीसी प्रस्तावित
जिल्ह्यातील धर्माबाद येथे औद्योगिक वसाहत निर्माण करावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनधींकडून सातत्याने मागणी सुरू आहे, त्यामुळे धर्माबादेत औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे, तर मारताळा येथेही औद्योगिक वसाहत प्रस्तावित असून, भोकर येथे एमआयडीसीची १४ हेक्टरवर वसाहत आहे. सदर जागा महाराष्ट्र उद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून, त्याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतर भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे.
एमआयडीसीनिहाय भूखंडाचे शुल्क
जिल्ह्यातील पाच औद्योगिक क्षेत्रातील भूखंडासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. विशिष्ट कालावधीसाठी लीजवर दिलेल्या भूखंडाला औद्योगिक विकास महामंडाळाकडून नांदेड कार्यक्षेत्रात २४२० रुपये स्क्वेअर मीटर कुष्णूर उद्योगिक वसाहत २५० रुपये स्क्वेअर मीटर देगलूर कंधार व किनवट येथे २०० रुपये स्क्वेअर मीटर याप्रमाणे वार्षिक शुल्क आकारण्यात येते.