जुन्या नांदेडातील गाळ्यांसाठी २३८ अर्ज; उत्पन्न वाढीसाठी मनपाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:35 AM2019-02-08T00:35:33+5:302019-02-08T00:35:53+5:30
जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
नांदेड : जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचवेळी २९ गाळ्यांसाठी मात्र फेरप्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे या गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महापालिकेच्यावतीने शहरात तीन ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये जुन्या नांदेडातील बंजारा हॉस्टेल गाळ्यामध्ये ६८ गाळे, काबरानगर येथे २८ आणि श्रावस्तीनगर येथे १३ गाळे प्रस्तावित आहेत. या सर्व गाळ्यांचे काम सुरू आहे. काही गाळ्यांचे काम ८० टक्के तर काही गाळ्यांचे काम ५० ते ६० टक्के इतके आहे.
हे गाळे ४० वर्षासाठी भाड्याने देण्यासाठी आज प्रक्रिया राबविण्यात आली. या गाळ्यांसाठी महापालिका ५ लाख, ७ लाख रुपये अनामत घेणार आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसात ५० टक्के अनामत रक्कम भरावे लागणार आहेत. त्यानंतर उर्वरीत रक्कम गाळा ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेकडे भरावी लागणार आहे. यामध्ये बंजारा हॉस्टेल गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जदाराकडून प्रत्येकी २० हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेने घेतली आहे. एका गाळ्यासाठी ३ बोलीधारक पात्र करण्यात आले आहेत. २९ गाळ्यांसाठी बोलीधारक निश्चित झाले असून ११ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.
उर्वरीत ३९ गाळ्यांसाठी मात्र एकास तीन या प्रमाणे बोलीधारक आले नाही. तसेच अन्य काही बाबीमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या ३९ गाळ्यांसाठी फेरप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त अजितपालसिंघ संधु यांनी सांगितले.
दरम्यान, काबरानगर येथील २८ आणि श्रावस्तीनगर येथील १३ गाळे भाड्याने देण्यासाठी महापालिका लवकरच प्रक्रिया सुरू करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने उभारलेले गाळे घेण्यासाठी नागरिक इच्छुक असून यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. तसेच गाळ्यांचे अर्धवट कामेही पूर्ण होणार आहे.