नांदेड जिल्हा रुग्णालयासाठी अडीच कोटीचे अनुदान मंजूर ; अत्यावश्यक यंत्रसामुग्रीची होणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:25 PM2018-01-12T19:25:51+5:302018-01-12T19:28:23+5:30
विष्णूपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता अधिक सुसज्ज होणार आहे. व्हेंटीलेटरसह इतर अत्यावश्यक यंत्राच्या खरेदीसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे.
नांदेड : विष्णूपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता अधिक सुसज्ज होणार आहे. व्हेंटीलेटरसह इतर अत्यावश्यक यंत्राच्या खरेदीसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अत्यावश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही दिवसापासून विविध स्तरावर पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. २०१७-१८ या वित्तीय वर्षाकरिता राज्यशासनाच्या २५ टक्के हिश्याअंतर्गत मंजूर अनुदानातून संस्थेकरिता यंत्रखरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आले असून अडीच कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे. या अडीच कोटीतून २३ लाख रुपये किंमतीचे २ व्हेंटीलेटर घेण्यात येणार आहेत.
याबरोबरच पी.एफ.टी. मशिन विथ बॉडीप्लेथीमेग्राफ (बायबॅक)-१, आॅटोमॅटेड एनझीम इम्युनोएस्से अनालायझर-१, ट्रायनोक्युलर रिसर्च मायक्रोस्कोप-१, अल्ट्रासोनोग्राफी मशीन-१, बेसीक अनेस्थेशिया वर्कस्टेशन मशिन-४, पेन्टाहेड मायक्रोस्कोप-२, फुल्ली अॅटोमॅटेड सेल काऊंटर-५ पार्ट-२, बायनाक्युलर मायक्रोस्कोप-२०, लॅपरोस्कोपी हॅन्ड इन्स्ट्रुमेन्टस्-१, इलेक्ट्रो सर्जीकल कॉटरी-३, सीआर्म-२ आदी यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे. रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची यंत्रसामुग्री उपलब्ध होणार असल्याने या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत आहे. मोजके व्हेंटीलेटर असल्याने हृदयविकाराचा त्रास होणार्या आणि तातडीने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना हाताळताना पूर्वी अडचणी येत होत्या. ही अडचणही आता दूर होणार आहे.
दरम्यान, नव्याने यंत्रसामुग्री येणार असली तरी या यंत्रांच्या हाताळणीकरिता नव्याने पद निर्मितीची आवश्यकता नसल्याचे संचालक व संबंधित अधिष्ठाता यांनी खातरजमा करावी. याबरोबरच सदरील यंत्रसामुग्रीची आवश्यकता असल्याचे व खरेदीवेळी त्याची किंमत बाजारभावापेक्षा जास्त नसल्याची खात्रीही वैद्यकीय शिक्षण संचालकांनी करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
गार्डनकडे दुर्लक्ष
शासकीय रुग्णालय परिसरात लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या गार्डनकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरात लावलेली फुलांची झाडे पाण्याअभावी वाळली आहेत. वर्षभरातच संपूर्ण लॉनदेखील वाळली. त्याचबरोबर रुग्णालयासह परिसराच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.