वीजबिलाचा बोजा उतरला;नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकरी संपूर्ण थकबाकी मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 01:42 PM2022-02-11T13:42:17+5:302022-02-11T13:42:43+5:30
नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती.
नांदेड : कृषीपंपाची वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलाच्या थकबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ४९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. दरम्यान नांदेड परिमंडळातील ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकी भरली.
नांदेड परिमंडळात धोरणापूर्वी कृषीपंपाची थकबाकी ४२०२ कोटींच्या घरात होती. दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून १७१२ कोटी ७७ लाख माफ झाले. तर सुधारित थकबाकीतही ५० टक्के थकबाकी माफ होत असल्याने शेतकऱ्यांना ५० टक्के हिश्श्यापोटी १२४८ कोटी ५५ लाख अधिक सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल ६५३ कोटी ६२ लाख असे मिळून १९०२ कोटी १७ लाख रूपये भरायचे आहेत. या देय रकमेपोटी आतापर्यंत ९४ कोटी ६९ लाखांचा भरणा वर्षभरात झाला. वसुलीचे हे प्रमाण केवळ ४.९८ टक्के इतकेच आहे. नांदेड परिमंडळातील केवळ ३ हजार ६३९ शेतकऱ्यांनीच कृषीधोरणाचा फायदा घेत १०० टक्के थकबाकीमुक्त झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनी फक्त कारवाई टाळण्यासाठी जुजबी रक्कम भरलेली आहे.
योजनेसाठी पात्र असलेल्या ३ लाख ५ हजार ४५३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ३३ हजार ९६९ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे.
यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ५६ हजार ४१४ शेतकऱ्यांनी सहभागी होत ४५ कोटी ०२ लाख रुपयांचा भरणा केला. परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९० शेतकऱ्यांनी सहभागी होत २५ कोटी १७ लाख तसेच हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ४६५ शेतकऱ्यांनी २४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा केला आहे. वसूल रक्कमेतील ३३ टक्के रक्कम गाव पातळीवर व ३३ टक्के रक्कम जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत कामांत वापरली जात असल्याने पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज समस्यांतून मुक्तता होत आहे. वसुलीमुळे उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नांदेड परिमंडळात आतापर्यंत १ हजार ६३९ कृषीपंप वीज जोडण्या देण्याचे काम झाले आहे.