छत्रपती संभाजीनगरातून ३० हजार वाहनांची रेल्वेने होणार देशभर वाहतूक
By प्रसाद कुलकर्णी | Published: September 12, 2023 05:31 PM2023-09-12T17:31:03+5:302023-09-12T17:31:50+5:30
आता ॲटोमोबाइल्सच्या वाहतुकीतून रेल्वे व पर्यायाने मराठवाड्याला उत्पन्न मिळणार आहे.
नांदेड : रेल्वेच्यानांदेड विभागाने भारतीय परिवहन महामंडळासोबत करार केला असून त्या अंतर्गत या आर्थिक वर्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे ३० हजार वाहनांची भारताच्या इतर विभागामध्ये वाहतूक केली जाणार आहे.
नांदेड विभागाच्या गुड्स लोडिंग क्षेत्रात ८ सप्टेंबर हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. या दिवशी नांदेड विभागाने छत्रपती संभाजीनगर येथून भारताच्या विविध भागांमध्ये ॲटोमोबाइल्स वाहतुकीसाठी भारतीय परिवहन महामंडळ (टीसीआय) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार नांदेड विभागाच्या लोडिंग पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास मदत होणार आहे. मराठवाडा विभाग कृषी उत्पादनांवर अवलंबून आहे. त्यातून मराठवाड्याला उत्पन्न मिळते. मात्र आता ॲटोमोबाइल्सच्या वाहतुकीतून रेल्वे व पर्यायाने मराठवाड्याला उत्पन्न मिळणार आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय परिवहन महामंडळाकडून सुमारे ३० वाहनांची रेल्वेने देशातील विविध भागात वाहतूक केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून ही वाहतूक होणार आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी भारतीय परिवहन महामंडळासोबत रेल्वे प्रशासनाने सामंजस्य करार केला आहे. हा करार नांदेड विभागातून शाश्वत मालवाहतुकीला प्रधान देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या स्वाक्षरी समारंभास परिवहन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक नीरजकुमार पांडे, नांदेड रेल्वेतर्फे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सहाय्यक परिचालक व्यवस्थापक एम. विवेकानंद तसेच नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांची उपस्थिती होती.