नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी
By प्रसाद आर्वीकर | Published: June 16, 2023 02:47 PM2023-06-16T14:47:21+5:302023-06-16T14:50:06+5:30
पथकाने बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली.
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने १५ जून रोजी राबविलेल्या तपासणी मोहिमेत एकाच दिवशी ३०२ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध ३४५ केसेस करुन २ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वे गाड्यांमधून अनेक प्रवासी विनातिकिट प्रवास करीत असल्याची बाब तपासणीत उघड झाली आहे. येथील विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रवि तेजा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी हुजूर साहीब नांदेड आणि पूर्णा रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. २५ तिकिट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
या मोहिमेत विनातिकिट प्रवास करणाऱ्या ३०२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ३१ अनियमित प्रवासी आणि १२ अनबुकड लगेज मिळून आले. एकूण ३४५ केसेस पथकाने केल्या असून, त्यात २ लाख ४० हजार २३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांनी योग्य तिकिट घेऊनच प्रवास करावा तसेच अनाधिकृत फेरीवाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी केले आहे.
बसने प्रवास अन् रेल्वेस्थानकावर धाड
तपासणी मोहिमेत सहभाग घेतलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी धाड टाकण्यासाठी बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली. त्यानंतर सायंकाळी पूर्णा रेल्वेस्थानकावर ५ अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.