नांदेडात ३१ बालकामगारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:18 AM2018-12-25T00:18:16+5:302018-12-25T00:18:58+5:30
शहरातील विविध हॉटेल, फूलविक्री दुकाने तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या ३१ बालकामगारांची शिवाजीनगर पोलिसांनी सुटका केली आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली.
नांदेड : शहरातील विविध हॉटेल, फूलविक्री दुकाने तसेच अन्य ठिकाणी काम करणाऱ्या ३१ बालकामगारांची शिवाजीनगर पोलिसांनी सुटका केली आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत ही कामगिरी करण्यात आली.
बालकामगारांकडून काम करुन घेणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, शहरातील अनेक आस्थापनांमध्ये अत्यल्प मोबदला देवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत पोलिसांनी २३ आणि २४ डिसेंबर रोजी या बालकामगारांच्या सुटकेसाठी मोहीम राबविली. मोहिमेअंतर्गत कारवाई करुन शिवाजीनगर पोलिसांनी ३१ बालकामगारांची सुटका केली.
शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील, पोकॉ. मीनाक्षी बनसोडे, चालक पुलकुंठवार हे गत चार दिवसांपासून विविध आस्थापनांवर लक्ष ठेवून होते. सोमवारी अचानक छापेमारी करत तब्बल ३१ बालकामगारांची सुटका या पथकाने केली. शिक्षण घेण्याच्या बालवयात या मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडणाºया त्यांच्या पालकांना ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले.
निराधार मुलांना शेल्टर होममध्ये पाठविण्यात येणार आहे. बालकामगारांना यापुढे कामावर ठेवल्यास संबंधित आस्थापना मालकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोनि. सुरवसे यांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हरवलेल्या निराधार व काम करणा-या बालकांना पालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे.
कामगार कल्याण अधिकारी कार्यालय बेखबरच
१४ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांना कोणत्याही अस्थापनांमध्ये कामावर ठेवू नये असा नियम आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-या अथवा कामावर ठेवणा-या व्यक्तीवर बालकामगार कायद्यान्वये कारवाई करता येते. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कामगार कल्याण अधिका-यांची आहे. मात्र नांदेड शहरात हे कार्यालय नावापुरतेच असल्याचे विविध आस्थापनांत बालकामगारांची संख्या पाहून दिसून येते.