१० मिनिटांत एटीएम मशीनमधून ३१ लाख लुटले; नऊ महिन्यांनी मध्यप्रदेशातून तिघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:46 PM2022-04-05T19:46:44+5:302022-04-05T19:47:06+5:30
हरियाणा येथील टोळीतील तिघे चोरटे मध्य प्रदेशातून पोलिसांच्या ताब्यात...
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने अवघ्या दहा मिनिटांत फोडून चोरट्यांनी ३१ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणातील परप्रांतीय टोळीतील तिघे जण अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात एसबीआय बँकेचे एटीएम मुख्य रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते.दि.२९ जुन २०२१ मंगळवारी पहाटे ३ वाजून २९ मिनिटांला चोरटे एटीएममध्ये शिरले होते. त्यानंतर गॅस कटरचा वापर करून अवघ्या पंधरा मिनिटांत म्हणजे ३ वाजून ४२ मिनिटांला चोरटे एटीएममधील ३१ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. सदर चोरी प्रकरणी आर्धपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ही चोरी करणारी परप्रांतीय टोळी अखेर नऊ महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सापडली. पोलिसांच्या तपासात मूळ हरियाणा येथील ही टोळी मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी मध्यप्रदेशातून इर्शाद आसमोहम्मद मेवाती ( ३६, बुराका थाना हथिन जि. पलवल हरियाणा ) , सलीम हसन मोहम्मद ( २६, मेवाती जुना मोहल्ला जवळ गाव उटावड ठाणा उटावडा तहसील जि पलवल राज्य हरियाणा) , मुस्ताक इस्लाम मेवाती ( ४३, अंधाका ठाणा नुहसदर ता.जि.नुह राज्य हरियाणा) यांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी महम्मद तय्यब,सतिष लहानकर,संदिप पाटील, कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी केली. न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राजेश घुन्नर,चाटे, रामराव घुले हे तपासकार्यात मदत करत आहेत.