परभणीत ३१, तर नांदेडमध्ये २४ महसूल मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:50+5:302021-07-23T04:12:50+5:30
दोन दिवस संततधार सुरू असल्याने विष्णुपुरी प्रकल्पात ९०.६८ टक्के जलसाठा झाला आहे. सहा गेट उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ...
दोन दिवस संततधार सुरू असल्याने विष्णुपुरी प्रकल्पात ९०.६८ टक्के जलसाठा झाला आहे. सहा गेट उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. उमरी तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, पैनगंगेला पूर आल्यामुळे शेकडो हेक्टर शेतामध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील माहूर, किनवट, हदगाव, कंधार, देगलूर, आदी तालुक्यांत पावसाने मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यात ६२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २४ मंडळांत अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यातील जलधारा महसूल मंडळात झाला आहे. येथे २०७.५० मि.मी. पावसाची नोंद, तर इस्लापूर मंडळात १७५.७५ आणि शिवणी मंडळात १७४ मि.मी. पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यात सरासरी ७० मि.मी. पाऊस झाला आहे. ३१ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून सिगणापूर मंडळात सर्वाधिक ९५.५ मि.मी. पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे परभणी शहराला जोडणारे पालम-परभणी, पाथरी-परभणी, गंगाखेड-परभणी, ताडकळस-परभणी या प्रमुख मार्गावर पाणी असल्याने परभणीशी संपर्क तुटला आहे; तर तालुक्याला जोडणाऱ्या बहुतांश मार्गावर पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.
या पावसामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल बंधाऱ्याचे २ आणि तारुगव्हाण बंधाऱ्याचे २ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पूर्णा, गोदावरी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत असून, येलदरी धरणाच्या वरच्या भागात अतिवृष्टी झाल्याने या प्रकल्पांत ही पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत एकूण ४२.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६६.०१ टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
हिंगोली ४२.४० (५११.१०) मि.मी., कळमनुरी ३७.५० (५३४.६०) मि.मी., सेनगाव ४५.२०(४९०.५०) मि.मी., वसमत ४५.७० (५१९.३०) मि.मी., औंढा नागनाथ ४१.२० (५९७) मि.मी. पाऊस झाला आहे.