बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 02:01 PM2020-07-01T14:01:50+5:302020-07-01T14:04:30+5:30

बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे.

31% of water from Babhali dam will go to Telangana | बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

बाभळी बंधाऱ्यातील ३१ टक्के पाणी जाणार तेलंगणात

googlenewsNext
ठळक मुद्देआज बाभळीचे १४ दरवाजे उघडणार त्रिसदस्यीय समितीची उपस्थिती 

धर्माबाद (जि. नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे १ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. बंधाऱ्यातील उपलब्ध साठा ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर जमा असून जमा पाणी तेलंगणात वाहून जाणार असल्याने येणाऱ्या दिवसांत या भागाला टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्घाटनाच्या सहा वर्षांत कोरडाठाक राहिलेला हा बंधारा मागील पावसाळ्यात परतीच्या पावसाने आॅक्टोबरमध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता.
 महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात या बाभळी बंधारा निर्मितीवरून वाद निर्माण झाल्यानंतर सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर  २८ फेब्रुवारी २०१३ रोजी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावेत व २९ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करावेत. तसेच उपलब्ध पाणीसाठ्यापैकी दशांश सहा टीएमसी पाणी एक मार्च रोजी तेलंगणात सोडण्यात यावे, असा निकाल दिला. या निकालानुसार १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. सध्या बंधाऱ्यात ०.६२८ टीएमसी म्हणजेच १७.८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. तो पूर्ण पाणीसाठा आता बुधवारी दरवाजे उघडल्याने तेलगंणात जाणार आहे.  

प्रकल्प सुरू करण्याची गरज
गतवर्षी पावसाळा लांबला त्यातच परतीच्या पावसाने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत हजेरी लावली. त्यामुळे बंधाऱ्याच्या उद्घाटनानंतर सहा वर्षांत पहिल्यांदाच बंधाऱ्यात २.७४ पाणीसाठा जमा झाला. गेली सहा वर्षे बाभळी बंधारा कोरडाठाकच होता. गतवर्षी पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बंद पडलेले उपसा जलसिंचन प्रकल्प चालू करावेत तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बंधाऱ्यातील पाणी नेण्यासाठी कृषीपंप अनुदान  देण्याची मागणी  होत आहे.

बंधाऱ्याची सुरक्षितताही धोक्यात
बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील वादग्रस्त प्रकल्प आहे. असे असताना या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे बंद व चालू करण्याच्या वेळेसच विद्युत पुरवठा चालू केला जातो. इतर वेळी मात्र बंधाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंधाऱ्याला जाण्यासाठी बाभळी गावापासून ३ कि.मी. रस्ता तयार करण्यात आला असून गेल्या सहा वर्षांपासून या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका युवकाने बंधाऱ्यावरून उडी मारून आत्महत्याही केली आहे. 

Web Title: 31% of water from Babhali dam will go to Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.