नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात, नाना पटोले यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 05:22 PM2024-01-28T17:22:59+5:302024-01-28T17:23:39+5:30
आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.
नांदेड- नितीशकुमार पुन्हा भाजपासोबत गेले आहेत. त्यावरुन मला लोकसभेतील लालू प्रसाद यांचे भाषण आठवते. आपल्या तोंडात ३२ दात असतात. मात्र नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात आहेत, असे ते म्हणाले होते. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते केव्हाही इकडून तिकडे जावू शकतात अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.
काँग्रेसच्या महिला मेळाव्यासाठी रविवारी नाना पटोले हे नांदेडात आले होते. ते म्हणाले, २०१४ पासून आतापर्यंतच्या काळात नितीमत्ता अन् सगळ्या व्यवस्थेला मातीमोल करण्याचे पाप भाजपाने केले आहे. भ्रष्टाचाराने पैसे कमवा, लोकांना विकत घ्या नाहीतर ईडी आणि सीबीआयचा वापर करा असे सुरु आहे. राजकीय नितीमत्ता संपविण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता आली आहे. बहुमताचे सरकार पाडणे सुरु आहे. महाराष्ट्रातही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराला मुठमाती देण्याचे काम केले. या राज्यात सध्या भ्रष्ट सरकार काम करीत आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. निवडणुकीत भाजपला घरी पाठविण्याचा मानस जनतेने केला आहे, असेही पटोले म्हणाले.
आठ ते दहा दिवसात जागा वाटप निश्चित
येत्या ३० तारखेला इंडीया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आले आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. ते किंवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील. येत्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील जागा वाटप निश्चित होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवर दावा केल्याचा विषयावर पटोले यांनी असे आता चालतच राहणार आहे. आठ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल असे सांगितले.
नितीश कुमार पलटूराम-चेन्नीथला
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची भाजपाला भीती वाटत आहे. त्यामुळे राहूल गांधी यांच्यावर बिनबोभाट आरोप केले जात आहेत. नितीश कुमार यांच्याबाबत काय बोलणार? आतापर्यंत ते किती वेळा पलटले आहेत. ते पलटूराम आहेत. उद्या आमच्यासोबतही येवू शकतात. त्यामुळे त्यांच्या बद्दल न बोललेच बरे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.