नांदेड येथे कापसाचे ३३ लाखांचे बोगस बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:33 PM2018-04-14T19:33:38+5:302018-04-14T19:33:38+5:30
खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बनावट कापूस बियाणे साठवुन ठेवलेल्या किनवट तालुक्यातील सारखणी येथील एका वेअर हाऊसवर कृषी व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज दुपारी कारवाई केली.
नांदेड : खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी बनावट कापूस बियाणे साठवुन ठेवलेल्या किनवट तालुक्यातील सारखणी येथील एका वेअर हाऊसवर कृषी व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज दुपारी कारवाई केली. यात जवळपास ३३ लाख ७९ हजार किंमतीच्या बोगस बियाणांचे ८४ पोते जप्त करण्यात आले.
कृषी विभाग व पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज दुपारी वडोली येथे वेअर हाऊसवर धाड टाकली. या धाडीत ४०० ग्राम वजनाचे ४ हजार २२४ पाकिटे जप्त करण्यात आली़ त्यामध्ये सम्राट, जयेंद्र, सिकंदर, जादु, जे़डी़, जे़एम़, आदी कंपन्यांच्या बोगस बियाणांचा समावेश होता़ त्याचबरोबर तुळजाई कृषी सेवा केंद्राचे मालक किशोर गुलाबराव कदम यांच्या घरुन बोगस बियाणांचे २४ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत़ खरीप हंगामापूर्वी केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे़ या धाडीत जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, डॉ़विजय भरगंडे, किनवटचे कृषी अधिकारी संजय कायंदे यासह हदगाव, कंधार, नायगावचे कृषी अधिकारी सहभागी होते़ तर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकात सपोनि शिवप्रकाश मुळे, अमिर शरीफ, वैजनाथ खडके, नागरगोजे, राठोड, फुलारी यांचा समावेश होता़ या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरु होती.