अर्जापूर व धर्माबाद येथीलपानसरे स्मारक सुधारणेसाठी ३४ वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:28 AM2018-05-16T00:28:33+5:302018-05-16T00:28:33+5:30
हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या अर्जापूर व धर्माबाद येथील स्मारकांसाठी राज्य शासनाने प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचे अनुदान दिले.
राजेश गंगमवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या अर्जापूर व धर्माबाद येथील स्मारकांसाठी राज्य शासनाने प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचे अनुदान दिले. आता स्मारकांची मोठी सुधारणा होणार आहे़ दरम्यान, धर्माबाद येथील काम सुरू झाले असून येत्या १५ दिवसांत अर्जापूर येथील स्मारकाच्या कामास प्रारंभ होणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे़
सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाने १९८४ निर्मित सर्व स्मारकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार प्रत्येक स्मारकासाठी दहा लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले़
स्मारकांची पुनर्बांधणी, रंगरंगोटी व गरजेनुसार सर्व कामांचे बांधकाम, साहित्य आदींचे प्रावधान ठेवण्यात आले़ मार्चपूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पर्धात्मक ई-निविदा मागवल्या़ त्यानुसार संबंधित ठेकेदारांना ही कामे सोपविण्यात आली आहेत़
दोन्ही स्मारकांचा आता सुशोभीकरण व कायापालट केला जाणार आहे़ धर्माबाद येथील स्मारकाचे काम सुरू झाले तर येत्या पंधरवड्यात अर्जापूर येथील बांधकाम सुरू करण्यात येणार आहे़ हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा आहेत़ निजाम राजवटीत रझाकारांच्या जुलमी अत्याचारात त्यांचा बिलोली न्यायालयातून परत धर्माबादकडे जात असताना अर्जापूर स्थित शिवारात हत्या झाली होती़
स्मारके झाली जीर्ण
रंगरंगोटीअभावी ही स्मारके जीर्ण अवस्थेत असल्याची स्थिती निर्माण झाली़ स्मारकासाठी दरवर्षी कोणतेही अनुदान नसल्यामुळे मागच्या ३४ वर्षांत या वास्तू अडगळीला पडल्या़ स्मारक सुधारणा व्हावी अशी चर्चा केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगीच होत असे़ पण ठोस असा पाठपुरावा कधीच झाला नाही़ परिणामी स्मारकांचे दुर्लक्ष झाले व अडगळीला पडू लागली़
स्मारकांची दयनीय अवस्था
सन १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ़स्व़ए़आऱ अंतुले यांनी हुतात्म्यांच्याप्रीत्यर्थ त्यांच्या मूळ गावी हुतात्मा स्मारक उभारण्याची संकल्पना पूर्ण केली़ संयुक्त बिलोली तालुक्यातील धर्माबाद व अर्जापूर येथे गोविंदराव पानसरे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले, अशा स्मारक सभागृहात प्रारंभी वाचनालय व महत्त्वपूर्ण बैठक आदींचे आयोजन करण्यात येत असे़ अर्जापूर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात तर धर्माबाद येथे शास्त्री महाविद्यालयाच्या मार्गावर स्मारके बांधण्यात आली़ कालांतराने स्मारकांची देखभाल नसल्याने दरवाजे, खिडक्या, छत, फरशी आदींची दयनीय अवस्था झाली़
हुग़ोविंदराव पानसरेंची समाधीदेखील अर्जापूरला आहे़ स्मारकापाठोपाठ समाधीजवळ देखील काही सुधारणा करणे आवश्यक आहे़ यापुढे स्मारकाच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कामाची दर्जा चांगला असावा ही अपेक्षा आहे.
-सतीश जोशी, अध्यक्ष, जनकल्याण सेवाभावी संस्था, अर्जापूऱ