हिमायतनगर तालुक्यात ४० टक्के शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:32 AM2019-06-03T00:32:39+5:302019-06-03T00:33:04+5:30
तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़
हिमायतनगर : तालुक्यात सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी पावसाअभावी खरीप, रबी हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे़ तर दुसरीकडे, तालुक्यातील ४० टक्के शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत़
शासनाच्या कर्जमाफी योजनांचा लाभ केवळ ६० टक्के शेतकऱ्यांना झाला आहे़ नियमित कर्ज भरणारे शेतकरी अद्यापही प्रतीक्षेतच आहेत़ या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान तत्त्वावर त्यांच्या खात्यात जमा करणार असले तरी, अगोदर त्या खात्यावरील इतर सर्व कर्जाचा बोजा उतरावा लागणार आहे,ही त्यासाठीची अट आहे़ नियिमत कर्ज भरणा-यांमध्ये अल्पभूधारक शेतकरी अधिक आहेत़ त्यामुळे शासनाकडून सरसकट सर्वच शेतकºयांची कर्जमाफी होईल, या आशेवर शेतकरी आहेत़
जो शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही,अशा शेतक-यांना बँक अधिकारी आपले कर्ज भरण्याच्या सूचना देत आहेत. पुनर्गठण असणा-या श्ेतक-यांच्या खात्यावरील पैसे बँक कापून घेत त्या खात्यावर होल्ड लावला जात आहे़ पेरणीचे दिवस जवळ आले आहेत़ शेतीतील नांगर, वखरणी करून पेरणीसाठी शेती सज्ज ठेवली असली तरी, बी-बियाण,े खते खरेदी कशी करावी? हा मोठा प्रश्न आहे़
बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ४० टक्के शेतक-यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही़ हिमायतनगर शहरातील स्टेट बँक शाखेत ६ हजार ६०० शेतक-यांचे खाते असून त्या खात्यानुसार एकूण ४४ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ९३२ शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून त्यांचे २६ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५०० शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असून त्यांच्यावर १८ कोटी ५० लाख रुपये कर्ज आहे़
दीड हजार जण वंचित
सरसम येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत एकूण ५ हजार शेतक-यांवर ३६ कोटी ८ लाख रुपये कर्ज आहे़ त्यातील ३ हजार ५३२ शेतक-यांच्या खात्यावरील २१ कोटी ९५ लाख रुपये कर्ज माफ झाले आहे़ तर २ हजार ५५० शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वंचित राहिले असल्याची माहीती मिळाली आहे.