कृष्णूर धान्य घोटाळा ४०० कोटींचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:12 AM2018-09-28T01:12:02+5:302018-09-28T01:12:25+5:30

सध्या गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळा सुमारे ४०० कोटींचा असल्याची माहिती तपास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांच्यासमोर साक्ष घेताना सांगितले़

400 crore of Krishnoor grain scam! | कृष्णूर धान्य घोटाळा ४०० कोटींचा !

कृष्णूर धान्य घोटाळा ४०० कोटींचा !

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोलीचे ६० ट्रक मेगा कंपनीत : बनावट ट्रक क्रमांक आढळले; पोलिसांची न्यायालयात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : सध्या गाजत असलेल्या कृष्णूर धान्य घोटाळा सुमारे ४०० कोटींचा असल्याची माहिती तपास अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुरुवारी बिलोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस़बी़ कचरे यांच्यासमोर साक्ष घेताना सांगितले़
गुरुवारी मेगा इंडियाचे मॅनेजर जयप्रकाश तापडिया यांच्या पुनर्विचार जामिन अर्जावर कचरे यांच्यासमोर सुनावणी झाली़ बचाव पक्षाचे अ‍ॅड़शिरीष नागापूरकर यांनी बाजू मांडली़ सरकार पक्षाकडून अ‍ॅड़ दिलीप बोमनाळीकर यांनी बाजू मांडली़ न्याक़चरे यांनी तपास अधिकारी नुरुल हसन यांनाही बाजू मांडण्याची संधी दिली़ हसन यांनी हिंदी भाषेत युक्तीवाद केला़ एफसीआयमधून निघालेल्या ट्रक क्रमांकाच्या नोंदीत व शासकीय धान्याचे वजन तंतोतंत मेगा अनाज फॅक्ट्रीच्या वजन काट्यावर आढळले़ पोलिसांनी १८ जुलै रोजी १० ट्रकवर केलेल्या कारवाईचे चित्रीकरण असून ट्रक चालकांना जबरदस्तीने मेगा कंपनीत नेल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला़ नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सहा महिन्याच्या काळात शेकडो ट्रक मेगा कंपनीत उतरल्याचे पुरावे असल्याचे सांगत याबाबत चौकशी अहवाल असलेला पेनड्राईव्ह त्यांनी न्यायालयाला दाखवला़ अ‍ॅड़ जयप्रकाश तापडिया याच्या हातावरच संपूर्ण आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावेही पोलिसांकडे असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान गुरुवारी जामिनासंदर्भातील युक्तीवाद पूर्ण झाला असून २८ सप्टेंबर रोजी यावर निर्णय आहे़
दरम्यान, इंडिया मेगा अनाज कंपनीत हिंगोली जिल्ह्यातीलही ६० ट्रक शासकीय धान्य उतरविल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत़ त्यामुळे हिंगोलीचे वाहतूक ठेकेदार ललित खुराणा हे देखील अडचणीत सापडले आहेत़ बिलोली न्यायालयात तीन वेळा सादर केलेल्या ५० पानी अहवालात घोटाळ्याची सविस्तर माहिती देण्यात आली असून यात नांदेडचे दोन आणि हिंगोलीच्या एक अशा तीन वाहतूक ठेकेदारांवर मुख्य आरोप आहेत़ नांदेड जिल्ह्यातील १९३ व हिंगोली जिल्ह्यातील ६० ट्रकचे क्रमांक अस्तित्वातच नाहीत़ ट्रक क्रमांकाचा सविस्तर तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आला़वरील सर्व ट्रक टीपी जुळवणीनुसार एफसीआयमधून निघालेले असून कहाळा टोल मेगा वजन काट्यावरच्या नोंदीत आढळले़ दोन-तीन तासाच्या फरकाने पुन्हा कहाळा टोल नाक्यावरून परतीचा प्रवास झाल्याचे रेकॉर्ड सापडले़ असाच टीपी जुळवणी नुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव येथे पोहचवणारे ६० ट्रक शासकीय धान्य मेगा कंपनीतच गेले़ बिलोली-देगलूर-मुखेड पाठोपाठ कहाळा-नायगाव मार्ग नसताना टीपी जुळवणी नुसार उमरी, भोकर, हदगाव, किनवट, अर्धापूर, लोहा व हिमायतनगर येथील ५६ धान्याचे ट्रक मेगा कंपनीतच आले़ तीन वेगवेगळ्या वाहतुकीचा आकडा आता ३०९ ट्रकवर पोहचल्याचे अहवालावरून दिसून येते़
 

  • एफसीआय गोदामातून शासन नियमानुसार तालुका गोदाम ते रास्त दुकानदार अशा दोन टप्प्यात धान्य पोहोच करण्याची जबाबदारी ठेकेदारावर होती़ धान्य खरेदीचा हा व्यवहार दोन नंबरचा असल्याने कंपनीने वेगवेगळ्या व्यक्तींच्या बँक खात्यामधून आर्थिक उलाढाल केली़ राजू पारसेवार व अजय बाहेती यांचे सर्व रिकॉर्ड जप्त केल्यानंतर दोघांच्याही व्यवहारात जुळवणीअंती साम्य दिसून आले़ वेगवेगळ्या शहरातील १९ ट्रेडींग कंपनीकडून गहू व तांदूळ खरेदी केल्याची जी बीले - वे बिले सापडली त्या बिलावरील ट्रकचे क्रमांक बोगस निघाले़

Web Title: 400 crore of Krishnoor grain scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.