कंत्राटी परिचारिकेने ९ वर्षांत केल्या ४०० सुलभ प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:58 AM2019-05-12T00:58:53+5:302019-05-12T00:59:25+5:30
आदिवासी तालुक्यातील अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असतानाही येथे कार्यरत कंत्राटी परिचारिकेने नऊ वर्षांत येथेच ४०० महिलांची सुलभ प्रसूती करून कार्याचा ठसा उमटविला.
गोकुळ भवरे
किनवट : आदिवासी तालुक्यातील अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत मोडकळीस आली असतानाही येथे कार्यरत कंत्राटी परिचारिकेने नऊ वर्षांत येथेच ४०० महिलांची सुलभ प्रसूती करून कार्याचा ठसा उमटविला. त्यामुळे जि़प़च्या आरोग्य विभागाची मान उंचावली आहे़, असे असतानाही परिचारिका मानधनावरच कर्तव्य बजावत आहे़ दुसरीकडे मानधन वाढीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याची खंत आहे़
किनवट या आदिवासी, डोंगराळ, अतिदुर्गम ,तालुक्यातील अंबाडी आरोग्य उपकेंद्रांतर्गत अंबाडीसह अंबाडीतांडा, भीमपूर या तीन ग्रामपंचायती येतात़ तर या तीन ग्रामपंचायतींअंतर्गत जगदंबातांडा, पितांबरवाडी, शिवरामखेडा व वरगुडा या आदिवासी वस्त्या येतात़ गेल्या कित्येक वर्षांपूर्वी अंबाडी येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली़ त्यात प्रसूतीगृहही होते़ मात्र प्रसूतीगृहासह इमारतीचा छत व त्याचे प्लास्टर कोसळण्याच्या मार्गावर आहे़ जीव धोक्यात घालून येथे कार्यरत कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत़
नऊ वर्षांपूर्वी कंत्राटी परिचारिका म्हणून सविता माधव चव्हाण या परिचारिकेने अंबाडी येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभार स्वीकारला़ येथेच वास्तव्यास राहून गेल्या नऊ वर्षांत रात्री-अपरात्री येथे दाखल होणाऱ्या रूग्णांवर उपचार केला व ४०० गर्भवती महिलांची नॉर्मल पद्धतीने प्रसूती करून विक्रम नोंदविला आहे़ कोणाचीही मदत न घेता व कुठलीही व्यवस्था नसताना स्वत: या परिचारिकेने नॉर्मल प्रसूती करून वेळ व पैसा वाचविला आहे़ जर या प्रसूती तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात किंवा सरकारी दवाखान्यात रेफरची वेळ आली असती तर आर्थिक झळही सोसावी लागली असती़ एएनएम कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रथम चार ते पाच महिने सविता चव्हाण या परिचारिकेने खासगी रुग्णालयात काम केले़ त्यानंतर म्हणजे नऊ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रथम आठ हजार रुपये व नंतर चौदा हजार रुपये मानधनावर कंत्राटी जॉब मिळाला़ या संधीचे सोनं करत गोरगरिबांना वेळीच प्रथमोपचार देत आरोग्य सेवा दिली व देत आहेत़ आरोग्य उपकेंद्राची इमारत धोकादायक बनली आहे नव्हे, पावसाळ्यात गळती लागते. राहायला इमारत नाही़ अशा परिस्थितीत आरोग्य खात्याचे कर्मचारी काम करीत असताना शासनाने त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़
नऊ वर्षांत ४० लाख वाचविले
जर या ४०० प्रसूती खासगी दवाखान्यात करण्याची वेळ आली असती तर साधारणत: नऊ वर्षांत ४० लक्ष रुपये मोजावे लागले असते़ अशा या कर्तव्यतत्पर परिचरिकेला नर्स दिनाच्या शुभेच्छा व जिल्हा परिषदेने अशा या परिचारिकेचा सन्मान तर करावाच पण सेवेत कायम करून शाबासकीची थाप मारावी म्हणजे काम करण्याला हुरूप वाढेल़ मात्र यासंदर्भात वारंवार लक्ष वेधूनही शासन दुर्लक्ष करीत आहे़ जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्या असलेल्या इमारतीत एका खोलीत राहणे व दुस-या खोलीत प्र्रसूतीगृह करून गरजू गोरगरीब महिलांची प्रसूती सुलभतेने करून दुवा घेत आहेत़
नऊ वर्षांपूर्वी कंत्राटी परिचारिका म्हणून रूजू झाल्यानंतर आलेली प्रत्येक महिलारुग्ण देव मानून मी तिची सेवा केली़ यात कुठलाही हलगर्जीपणा केला नाही़ एकूणच केलेल्या कामावर मी समाधानी आहे़
-सविता माधव चव्हाण, परिचारिका, प्रा़आक़ेंद्र, अंबाडी