४२ गुणवंतांना सुवर्णपदक, २२,२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:28 AM2021-05-05T04:28:54+5:302021-05-05T04:28:54+5:30
यावेळी मुंबई येथून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे ...
यावेळी मुंबई येथून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस. रामकृष्णन हे उपस्थित होते, तर विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह डॉ. प्रशांत वक्ते, डॉ. वसंत भोसले, डॉ. पंचशील एकंबेकर, डॉ. वैजयंता पाटील आणि कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, हरितक्रांती, कोविड लॅब यासारख्या सामाजिक बांधीलकीतून निर्माण केलेले उपक्रम हे खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यापीठ परिसरामध्ये असे अनेक शैक्षणिक हब निर्माण झाले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत आपल्याकडील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगितले, तर प्रा. डॉ. एस. रामकृष्णन म्हणाले, केवळ पदवी संपादन करण्यासाठी शिक्षण नाही, तर विविध प्रकारची जीवन कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील आहे. आपल्यासभोवती अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेत. ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. माधुरी देशपांडे यांनी केले.
चौकट...........
लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी मिळणार
उन्हाळी-२०२० परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वप्रथम आलेल्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जाहीर केले. याशिवाय ३९० पदविका, १७९१ पदवी, ४५५१ पदव्युत्तर आणि २५१ पीएच.डी.पदवीधारक असे एकूण २२,२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यू मॉडेल डिग्री कॉलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवीसाठी अर्ज केले आहेत त्यांना लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येणार आहे, तर तेविसाव्या दीक्षांत समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये वितरित करण्यात येणार आहेत.