नांदेड जिल्ह्यात दारुविक्रीतून ४२६ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:17 AM2018-04-04T00:17:18+5:302018-04-04T00:17:18+5:30
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारु विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा तब्बल ४२६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ९७ कोटी रुपयांनी अधिक आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दारु विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा तब्बल ४२६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा ९७ कोटी रुपयांनी अधिक आहे़
गतवर्षी राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरच्या अंतरावर येणारी दारु दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता़ त्यामुळे महामार्गावरील शेकडो दारु दुकानांना टाळे लागले होते़ तर नांदेड जिल्ह्यात तब्बल पाचशे दुकानांना टाळे लागले होते़ जिल्ह्यात असलेल्या ६६१ दुकानांपैकी ४९४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़
त्यानंतर या निर्णयात बदल झाला तरी, सर्व प्रक्रियेमध्ये राज्य उत्पादन शुल्कला बरीच कसरत करावी लागली़ नोटाबंदी, जीएसटी या निर्णयामुळेही यंदा महसुलात घट होणार अशी चिन्हे होती़
जिल्ह्यामध्ये परवानाधारक दारु विक्रेत्यांकडून झालेल्या दारुच्या विक्रीपोटी जिल्हा प्रशासनाला महसूल प्राप्त होतो़ त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण असते़ दरवर्षी या विभागाला महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते़ आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला ४०६ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ परंतु आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर लगेच न्यायालयाचा आदेश येवून धडकला़ त्यामुळे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याबाबत अधिकारीही साशंकच होते़ असे असताना नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने मात्र १०५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ यंदा विभागाने ४२६़८२ कोटी रुपयांची वसुली केली आहे़ गतवर्षी झालेल्या ३२९ कोटी ७७ लाखांपेक्षा ही वसुली तब्बल ९७ कोटी १५ लाखांनी अधिक आहे़ त्यामुळे यंदा दारु विक्रीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ त्याचबरोबर अवैध दारुविक्रीच्या विरोधात केलेल्या कारवायांची संख्याही अधिक आहे़ वर्षभरात विभागाने १६३५ केसेस केल्या़ त्यातील ११२२ गुन्हे नोंदविले़ या प्रकरणात एकूण ११३१ जणांना अटक करण्यात आली असून ४९ वाहने जप्त करण्यात आली आहेत़ सर्व मिळून ८१ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ तर गतवर्षी एकूण गुन्ह्यांची संख्या ही १६३१ एवढी होती़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे म्हणाले, यंदा अवैध दारुविक्री रोखण्यासाठी विभागाने विशेष मोहिमा राबविल्या़ त्यासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना करुन वाडी-तांडे यासह इतर राज्यांतून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली़ त्यामुळे विषारी दारुने घडणाºया दुर्देवी घटनांना आळा घालण्यात यश आले़
जिल्ह्यात परमीट रुम बिअर बारची एकूण संख्या २२७, देशी दारुची १९० दुकाने, वाईन मार्ट १७ तर बिअर शॉपीची संख्या २२७ एवढी आहे़ नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न धर्माबाद येथील विदेशी दारुनिर्मिती कारखान्यामुळे मिळते़ येथील विदेशी दारु राज्यभरात निर्यात केली जाते़ त्यातून कोट्यवधी रुपयांचे निर्यात शुल्क विभागाला मिळते़