मराठवाड्यातील ५७ आमदारांना दोन महिन्यांसाठी मिळाला ४५ कोटींचा विकास निधी
By प्रसाद आर्वीकर | Published: October 21, 2022 06:37 PM2022-10-21T18:37:38+5:302022-10-21T18:38:22+5:30
विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.
- प्रसाद आर्वीकर
नांदेड : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या निधीपैकी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी मराठवाड्यातील ५७ आमदारांना ४५ कोटी ४६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी राज्याच्या नियोजन विभागाने वितरित केला आहे.
विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांना आपल्या मतदारसंघांमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. दरवर्षी या निधीची तरतूद करण्यात येते. राज्य शासनाच्या नियोजन विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १४६८ कोटी रुपयांची तरतूद राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमासाठी केली आहे. या निधीतून मतदारसंघात विविध कामे हाती घेतली जातात. दरम्यान, शासनाच्या नियोजन विभागाने २० ऑक्टोबर रोजी एक आदेश काढून राज्यातील विद्यमान विधान मंडळ सदस्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी अनुज्ञेय असलेला निधी वितरित केला आहे. मराठवाड्यात ४६ विधानसभा सदस्य असून ११ विधान परिषदेचे सदस्य आहेत. या ५७ आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी ४५ कोटी ४६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीन राहून वितरण
जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांच्या अधीन राहून या निधीचे पुढील वितरण तात्काळ करावे. तसेच या निधीमधून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वेळोवेळी अनुज्ञेय केलेल्या बाबींवरील खर्च लेखाशीर्षअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा, असे आदेशात नमूद केले आहे.
मराठवाड्यातील आमदारांनी मिळालेला निधी
जिल्हा आमदारांची संख्या निधी
नांदेड ११ ८.६६
परभणी ०५ ४.००
हिंगोली ०५ ४.००
बीड ०७ ५.६०
लातूर ०८ ६.४०
उस्मानाबाद ०४ ३.२०
जालना ०६ ४.८०
औरंगाबाद ११ ८.८०
(निधी कोटींत)