वसमत येथे एलआयसी कार्यालयात ५ लाखाची चोरी, गॅस कटरने कापली तिजोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 01:13 PM2017-12-26T13:13:16+5:302017-12-26T13:14:08+5:30
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी 5 लाख 36 हजार व चेकबुकसह काही महत्वाची कागदपत्रे लांबवली आहेत.
वसमत ( हिंगोली ) : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी 5 लाख 36 हजार व चेकबुकसह काही महत्वाची कागदपत्रे लांबवली आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, शहरात मुख्यरस्त्यावर असलेल्या एलआयसीचे कार्यालय असलेल्या इमारतीमध्ये रात्री चोरट्यांनी बाथरुमची खिडकी काढून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापली व आतील रोख रक्कम पळवली. सकाळी शाखा व्यवस्थापकांनी कार्यालयात येताच त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनला चोरी बद्दल कळवले. पोलिस निरीक्षक उदयशीह चंदेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली व पंचनामा केला.
यावेळी अधिक पाहणीत तिजोरीतील रोख ५ लाख ३६ हजार व चेकबुकसह महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.एलआयसीच्या कार्यालयात चोरीची माहिती शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. दरम्यान, या कार्यालयाच्या शेजारीच एसबीआयची शाखा आहे. यामुळे नागरिकांमधून चोरीच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.