आत्महत्येस जबाबदार पतसंस्था अध्यक्षास ५ वर्षे सक्तमजुरी; नांदेडच्या सहायक जिल्हा न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:37 PM2017-12-29T17:37:35+5:302017-12-29T17:37:42+5:30
पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
नांदेड : पतसंस्थेतील गुंतवणूकदार यांच्या त्रासाला आणि अध्यक्षांच्या दामदाटीला कंटाळून २०१६मध्ये पतसंस्थेच्या सचिवाने आत्महत्या केली होती़ याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षाला नांदेडचे सहायक जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे सन २००२ मध्ये भीमराव दुधे आणि लक्ष्मीकांत गोविंदवार यांनी शिवाजी पतसंस्था काढली. या पतसंस्थेचे दुधे हे संस्थापक अध्यक्ष आहेत तर गोविंदवार हे सचिव म्हणून कार्यरत होते. पतसंस्थेचा कारभार उत्कृष्ट सुरु असताना दुधे यांनी २०१२ मध्ये वसंतराव नाईक भाजीपाला संस्था काढून शिवाजी पतसंस्थेतील सर्व पैसे या संस्थेत वर्ग केले.
दरम्यान, शिवाजी पतसंस्थेतील गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यावरुन गोविंदवार आणि दुधे यांच्यात वाद निर्माण झाला. गुंतवणूकदारांकडून सतत पैशाची होणारी मागणी आणि दुधे यांच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मीकांत गोविंदवार यांनी १६ एप्रिल २०१६ रोजी माहूर येथील दत्तशीखर परिसरात विष प्राशन करुन आत्महत्या केली.
या प्रकरणात लक्ष्मीकांत गोविंदवार यांचा मुलगा डॉ. अभय गोविंदवार यांच्या तक्रारीवरुन माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्यासंदर्भातील नोट आणि इतर हस्तलिखित कागदपत्र हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविले. तपासानंतर माहूर पोलिसांनी भीमराव दुधे यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार या खटल्यात ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.
याप्रकरणी साक्षीदार तपासून नांदेड येथील सहा़जिल्हा न्यायालयाने लक्ष्मीकांत गोविंदवार यांच्या मृत्यूस भीमराव दुधे जबाबदार असल्याचा निकाल देत त्यास पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावल्याची माहिती सरकारी अॅड. रणजित देशमुख यांनी दिली.