नांदेड जिल्ह्यातील ५० गावे पिताहेत ‘फ्लोराईड’युक्त पाणी; ४७५४ पाण्याचे स्त्रोत पिण्यास अयोग्य
By प्रसाद आर्वीकर | Published: February 1, 2024 11:06 PM2024-02-01T23:06:20+5:302024-02-01T23:06:27+5:30
आठ महिन्यांत तपासले ८४२९ पाणी नमुने
नांदेड : जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अभ्यास केला असता ५० नमुने फ्लोराईड बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक फ्लोराईड बाधित नमुने किनवट तालुक्यातील आहेत. मागील आठ महिन्यांत एकूण तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ४७५४ जलस्त्रोत्रांतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालावरून पुढे आले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते.
पाणी नमुन्यात आढळलेल्या जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत घट झाल्याने येणाऱ्या काळात अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जिल्हा भूजल व विकास सर्वेक्षण यंत्रणेने एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या काळात सोळा तालुक्यातून ८४२९ पाणी नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३६७५ पाण्याचे स्त्रोत पिण्यास योग्य असून, ४७५४ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यातील ५० स्रोत हे फ्लोराईडयुक्त असून, ते दीड टक्क्यापेक्षा अधिक दूषित आहेत. म्हणून याबाबत गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील पाण्याचे नमुने दोन टप्प्यांत म्हणजे मान्सूनपूर्व व मान्सूननंतर घेण्यात येतात. स्त्रोतानुसार वेगवेगळे रंग देण्यात येतात. जिल्ह्यातील बहुतांश स्त्रोतांमध्ये फ्लोराईड, नायट्रेट, कर्ब आदींचे प्रमाण आहे. त्यात फ्लोराईड व नायट्रेटच्या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. संबंधित स्त्रोतांवर उपाययोजना केल्या जातात, अन्यथा पिण्याच्या पाण्याचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते. एकूण अयोग्य पाणी स्त्रोतांपैकी ५० स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले आहे. या स्त्रोतांमध्ये दीड टक्क्यांपेक्षा अधिक फ्लोराईड असल्याने पाणी पिल्यास आरोग्यास अधिक धोका असतो. त्यात प्रामुख्याने नळयोजना, हातपंप, विहिरी आदी स्त्रोतांमध्ये फ्लोराईडचे प्रमाण असल्याचे आढळून आले आहे.
फ्लोराईडच्या पाण्याचे दुष्परिणाम
फ्लोराईडचे पाणी पिल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. हातपाय वाकडे होणे, दात खराब होणे व अन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही वर्षांत जिल्हा प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु, उपाययोजना तोकड्या स्वरूपात असल्याचे दिसून येत आहेत. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे ४७२१ स्रोत असल्याचे पाणी नमुने तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना शुद्ध पाणी देणे गरजेचे आहे.
फ्लोराईडयुक्त पाण्याचा वापर करू नये. १.५ पीपीएमपेक्षा (पार्ट्स पर मिलीयन) अधिक दूषित असेल तर आरोग्यासाठी बाधक आहे. अशा ठिकाणी पिण्याचा वापर बंद करावा. हे पाणी केवळ सांडपाणी म्हणून वापरावे.
-डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण.
तालुकानिहाय आढळलेले फ्लोराईडयुक्त स्त्रोत
भूजल व सर्वेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तालुकानिहाय आढळून आलेले फ्लोराईडयुक्त स्त्रोत असे- अर्धापूर २, भोकर ८, बिलोली १ , धर्माबाद ७, किनवट १६, लोहा १, माहूर ३, मुखेड ४, नायगाव ६ तर उमरी तालुक्यात २ नमुने आहेत.