५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:43 AM2019-02-09T00:43:13+5:302019-02-09T00:45:58+5:30
येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला स्वत:ची जागा नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. वसतिगृहाचे वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीज बिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये शासनाला मोजावे लागतात. ५० वर्षांचे भाड्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.
लक्ष्मण तुरेराव।
धर्माबाद : येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला स्वत:ची जागा नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. वसतिगृहाचे वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीज बिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये शासनाला मोजावे लागतात. ५० वर्षांचे भाड्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.
धर्माबाद येथे डॉ़बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह सन १९७० मध्ये सुरू झाले. सुरुवातीला वसतिगृह लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या इमारतीत भाड्याने होते. तेथील इमारत मोडकळीस आल्यामुळे शहरातील आंध्रा बसस्थानकजवळील गुजराती यांची इमारत २०१४ मध्ये भाड्याने घेण्यात आली. येथील वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीजबिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये आहे. इमारतीमधील २३ खोल्यांत ७१ विद्यार्थी आहेत़ लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या इमारतीत असताना भाडे कमी होते ; पण त्या ठिकाणी मुलांना शौचालय, स्रानगृहाची व्यवस्था नव्हती़ अनेक सोयीसुविधेचा अभाव होता़ स्वत:चे क्रीडा मैदान नव्हते़ आताही मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मैदान नाही, क्रीडा साहित्य नाही़ सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत नाहीत़
तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत असल्याने म्हणाव्या तशा सोय सुविधा मुलांना मिळत नाहीत. कधी पाण्याचा अभाव तर कधी विजेची समस्या, स्वच्छतेचा अभाव, दरवाजे, खिडक्या मोडकळीस असलेले, छतातून पाणी गळणे, शौचालयात स्वच्छतेचा अभाव, कधी जेवणाची समस्या, असे एक ना एक समस्या भाड्याच्या इमारतीत दिसून येतात़ विशेष म्हणजे, मुलांना राहण्यासाठी खोल्या कमी आहेत. एका खोलीत ४-४ मुले असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत.
शासन मुलाच्या वसतिगृहावर लाखो रुपये खर्च करीत असले तरीही त्याचपद्धतीने भाड्याच्या इमारतीत राहिल्याने दुहेरी लाखोंचा भूर्दंड भरावा लागत आहे़ धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहासाठी ५० वर्षांपासून जागा शासनाला मिळाली नाही का? आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी वसतिगृहाच्या जागेसाठी पुढाकार घेतलेला नाही़ नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वसतिगृहासाठी जागा मिळाली, इमारतीत बांधून कार्यान्वित झाले, पण धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहासाठी जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. वसतिगृहात गुणवत्तेनुसार मुलांची निवड केली जाते़ यात सातवी पास, दहावी पास, बारावी पास गुणवत्तेनुसार आणि आयटीआय, डी.एड.ला प्रवेश घेतलेल्या मुलांना प्रवेश दिला जातो़ या वसतिगृहात जेवणाची, राहण्याची, स्टेशनरी, मासिक भत्ता इतर सुविधा शासनाकडून मोफत दिली जाते़
बाळापूर येथील मॉडेल स्कूलसाठी जागा देण्यात आली, ती जागा निवडली होती ; पण त्यामार्गे हायवे रस्ता होत असल्याचे सांगण्यात आल्याने रद्द करण्यात आला़ चार एकर जमीन आम्हाला आवश्यक आहे़ एखादी खाजगी जागा असेल तरीही शासन खरेदी करून जागा ताब्यात घेईल़ आवश्यक जागा मिळत नसल्याने भाड्याच्या इमारतीत राहावे लागते़ यावर पर्याय नाही़ जागेसाठी पाठपुरावा करीत आहोत-व्ही.बी. झंपलवाड, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गय वसतिगृह, धर्माबाद