‘मला पास करा’ लिहित उत्तरपत्रिकेत चिटकविल्या ५०० च्या नोटा
By प्रसाद आर्वीकर | Published: September 7, 2023 06:56 PM2023-09-07T18:56:27+5:302023-09-07T18:57:24+5:30
कॉपी करणाऱ्या १७२० विद्यार्थ्यांवर स्वारातीमची कडक कारवाई
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२३ परीक्षेमध्ये कॉपी करणाऱ्या १७२० विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कडक कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांवर संपादणूक रद्दची (डब्ल्यूपीसी- व्होल परफॉर्मन्स कॅन्सल) कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बी.सी.ए. प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याने सातही पेपरच्या उत्तरपत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या नोटा चिटकवून ‘मला पास करा’ असे लिहित उत्तरपत्रिका पर्यवेक्षांकडे सादर केल्याचा प्रकारही समोर आला आहे. कुलगुरु डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशावरुन या सर्व विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करण्यात आली आहे.
मानव्य विद्याशाखेतील ४८८, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील २७८, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील ३३९ आणि आंतरविद्याशाखेतील ६१५ अशा १७२० विद्यार्थ्यांची सर्व संपादणूक रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच यावर्षी अथवा या सेमिस्टरमध्ये दिलेल्या सर्व परीक्षांचा निकाल हा शून्य करण्यात येतो. यामधील दोन विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव (आरटीडी-रिझल्ट टू बी डिक्लेअर्ड) ठेवण्यात आला आहे. गैरवर्तणूक केलेल्यांपैकी ३ विद्यार्थ्यांना सर्व संपादणूक रद्द आणि अधिक चार परीक्षेसाठी बंदी अशीही कडक शिक्षा केली आहे.
नांदेड येथील एका विद्यार्थ्याने बी.सी.ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या कडक नोटा टिस्कोटेपद्वारे चिकटवून उत्तरपत्रिकेमध्ये ‘मला पास करा’ असे लिहून निमूटपणे या उत्तरपत्रिका परीक्षकांकडे सादर केल्या. नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर सदर बाब परीक्षकांच्या निर्देशनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठविण्यात आल्या. हे गैरवर्तुणकीचे प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ अन्वये विद्यापीठाच्या गठीत ४८ (५) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते. समितीने सदर गैरवर्तणूक प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांची सर्व विषयाची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षेसाठी बंदी घातली आहे. तसेच ३ हजार ५०० रुपयांची ही कुलगुरू फंडामध्ये जमा केली आहे.
लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सदर बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. संबंधित परीक्षा केंद्राने हे प्रकरण विद्यापीठाच्या निर्देशनास आणून दिले. त्यानुसार गठीत समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले. समितीने खऱ्या आणि तोतया अशा दोन्ही परीक्षार्थ्यांना बोलावून चौकशी केली. चौकशी अंती दोघांनीही गुन्हा काबुल केला. दोघांचेही उन्हाळी-२०२३ परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षेसाठी बंदी घातली आहे.
विद्यापीठातर्फे अशी कडक शिक्षा देण्यासंबंधी मागील दहा वर्षातील पहिलीच घटना आहे. या कार्यवाहीमुळे विद्यार्थ्यांवर वचक बसला असून भविष्यामध्ये कोणताही विद्यार्थी परीक्षेत गैरवर्तवणूक करण्याचे धाडस करणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या कॉपी बहाद्दरांवर आणखी कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाद्वारे विशेष पथक नेमण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.