एसडीआरएफमधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:16 AM2021-05-01T04:16:58+5:302021-05-01T04:16:58+5:30
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, राज्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या अनेक जिल्ह्यांना एसडीआरएफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला ...
यासंदर्भात त्यांनी सांगितले की, राज्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या अनेक जिल्ह्यांना एसडीआरएफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीचा उपयोग त्या-त्या जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने संबंधित जिल्हाधिका-यांना दिले होते. नांदेड जिल्ह्याने या पद्धतीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या निधीतील बहुतांश रक्कम उपयोगात आणली होती.
परंतु ३०.७६ पैकी काही निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे शिल्लक राहिला होता. या उर्वरित निधीतून जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याची मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंजुरी देत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी ५२ नव्या रुग्णवाहिका एसडीआरएफच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत. हा संपूर्ण निधी राज्य शासनाचाच असल्याचेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.