ऊसतोड कामगाराच्या मुलाची नीट परीक्षेत ५२० गुण; गावकऱ्यांना मिळणार पहिला डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 07:25 PM2022-09-10T19:25:37+5:302022-09-10T19:26:16+5:30
कोणत्याही सुविधा नसताना, घरात उच्च शिक्षणाचा वारसा नसताना दुर्गम खेड्यात राहून प्रकाशने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक परिपाठ ठरणार आहे.
- बालाजी नाईकवाडे
हणेगाव (नांदेड): डोक्यावर विस्तीर्ण आकाशाचे छत आणि उसाच्या फडाजवळच मिळालेली मोकळी जागा अशा खरतर परिस्थितीतून अभ्यास करून ऊसतोड कामगारांच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये ५२० गुण मिळविले आहेत. देगलूर तालुक्यातील दामला नाईक तांडा येथील प्रकाश राठोड या विद्यार्थ्याने हे यश मिळविले आहे. प्रकाश राठोड याच्या रूपाने दुर्लक्षित तांड्याला आता पहिला डॉक्टर मिळणार आहे.
तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्याच्या सीमेवरील दामलानाईक तांडा. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात गावोगाव भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमिक कुटुंबात प्रकाश राठोड याचा जन्म झाला. लहानपणापासूनच हलाखीची परिस्थिती, आई-वडिलांनी उदरनिर्वाहासाठी हातात घेतलेला कोयता. अशा परिस्थितीत प्रकाशने वस्ती शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.
जनापूर येथील चंगळामाता आश्रम शाळेत सातवीपर्यंत आणि कै. इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. शिक्षणाची गोडी लागल्याने प्रकाशने जिद्दीने अभ्यास केला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने तयारी सुरू केली. कोणत्याही भौतिक सुविधा नसताना, मार्गदर्शकांचा अभाव असतानाही प्रकाशने नीट परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश पदरी पडले. मात्र खचून न जाता जिद्दीने तयारी केली. अखेर चौथ्या प्रयत्नांत त्याने यशाला गवसणी घातली.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात प्रकाशला ५२० गुण मिळाले असून, डॉक्टर होण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोणत्याही सुविधा नसताना, घरात उच्च शिक्षणाचा वारसा नसताना दुर्गम खेड्यात राहून प्रकाशने मिळविलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक परिपाठ ठरणार आहे.
लोकमतच्या यश कथेने घडविले परिवर्तन
बारावीपर्यंत कोणतेही ध्येय समोर नव्हते. मात्र एकेदिवशी कॉलेजमधून गावाकडे येत असताना वाटेत लोकमत पेपर रस्त्यावर पडलेला दिसला. पेपर उचलून तो वाचत असताना त्यात शेतकरी कुटुंबातील मुलाने नीट परीक्षेत मिळविलेल्या यशाची यशोगाथा प्रकाशित झाली होती. ती यशोगाथा वाचली आणि डॉक्टर होण्याचे तेथेच ठरविले. लोकमत पेपरनेच माझ्यात परिवर्तन घडविले आणि आज ते स्वप्न पूर्ण झाले, असे प्रकाश राठोड याने सांगितले.
अख्या गावाच्या आनंदाला नव्हता पारावर
प्रकाश राठोड याने नीट परीक्षेत ५२० गुण मिळविल्याची वार्ता गावात समजताच अख्खे गाव आनंदित झाले. गावचे उपसरपंच मुजिपोद्दीन पटेल, पोलीस पाटील ताजीयोद्दीन पटेल, सहशिक्षक अशोक राठोड, सामाजिक कार्यकर्ते शेख मुबिन आदींनी प्रकाशच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच प्रकाशच्या यशात वाटा उचलणाऱ्या लोकमतचे आभार मानले आहेत.
गावाला मिळणार पहिला डॉक्टर
प्रकाश राठोड याची वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, त्याच्या माध्यमातून हनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दामला नाईक तांडा गावाला पहिला डॉक्टर मिळणार आहे.