नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 01:01 AM2018-11-02T01:01:18+5:302018-11-02T01:06:02+5:30

दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़

53 villages of Nanded district have a risk of fluoride | नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

नांदेड जिल्ह्यातील ५३ गावांना फ्लोराईडचा धोका

Next
ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल १६ तालुक्यांतील ८७ नमुने फ्लोराईड बाधित

अनुराग पोवळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत घट झाल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा सोसावा लागणार आहे़ दुसरीकडे उपलब्ध होणारे पाणीही किती शुद्ध आणि सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासात जिल्ह्यातील ५३ गावे फ्लोराईड बाधित असल्याचे पुढे आले असून, या विभागातर्फे घेण्यात आलेल्या नमुन्याच्या तपासणीत तब्बल ८७ नमुने बाधित आढळले आहेत़
जिल्ह्यात मागील पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी म्हणजेच ८१ टक्के पाऊस झाल्याने तब्बल १६ पाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीत चिंताजणक घट झाली आहे़ पर्यायाने येणा-या उन्हाळ्यात जिल्हावासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ तब्बल ४०१ गावांना पाणी टंचाईचा तडाखा बसेल असा अंदाज यापूर्वीच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे़ विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्यापासूनच मुखेड, देगलूर आणि कंधार या दुष्काळग्रस्त तालुक्यातील तब्बल ११५ गावांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे़
पावसाने दगा दिल्याने पाणी टंचाईची तीव्रता भीषण होणार आहे़ विशेषत: कंधार, मुखेड, देगलूर पाठोपाठ दुसºया टप्प्यातील जिल्यातील बिलोली, नायगाव या तालुक्यातील गावानाही झळ सोसावी लागणार आहे़ एप्रिल २०१९ ते जून २०१९ पर्यंत मुदखेड, धर्माबाद, बिलोली, उमरी, नायगाव या पाच तालुक्यातील तब्बल १७६ गावाना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे़ पहिल्या टप्प्यात देगलूर तालुक्यातील ६० गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याचा अंदाज आहे़ तर मुखेड तालुक्यातील ५३ आणि कंधार तालुक्यातील दोन गावे आॅक्टोबरपासूनच तहानलेली राहणार आहेत़ मुखेड तालुक्यातील ४० गावांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न उभा आहे़ तर बिलोली तालुक्यातील ३२ आणि नायगाव तालुक्यातील ८ गावांना पाणी टंचाई जाणवणार आहे़ टंचाईची ही तीव्रता तिस-या टप्प्यातही उग्र होण्याची शक्यता आहे़ नायगाव तालुक्यातील ६१ गावे टँकरवर विसंबून राहतील़ तर उमरी तालुक्यातील ५८ गावांना पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागेल़ संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून प्रशासनाने उपाय योजनांचे नियोजन सुरु केले असतानाच आता फ्लोराईड बाधीत पाण्याचा अहवाल पुढे आला आहे़
जिल्ह्यातील १६ तालुक्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने अभ्यास केला असता ८७ नमुने फ्लोराईड बाधीत आढळून आले आहेत़ यात सर्वाधिक फ्लोराईड बाधित नमुने नायगाव तालुक्यात आढळले असून तेथे तब्बल १८ नमुने बाधीत होते़ तर उमरी आणि कंधार तालुक्यात प्रत्येकी १७ आणि हदगाव आणि किनवट तालुक्यात प्रत्येकी १३ नमुने फ्लोराईड बाधीत असल्याचे दिसून आले आहे़
अर्धापूर तालुक्यात ३, नांदेड २, मुखेड २ तर भोकर आणि देगलूर तालुक्यातील प्रत्येकी १ नमुनाही फ्लोराईडयुक्त पाण्याने बाधीत असल्याचा हा अहवाल सांगतो़ या बाधित नमुन्यावरुन तब्बल जिल्ह्यातील ५३ गावांसमोर फ्लोराईडचे संकट कायम असल्याचे दिसून येते़ यात कंधार तालुक्यातील १३ गावे, उमरी १२, नायगाव १०, किनवट ६, हदगाव ६, नांदेड २ तर देगलूर, भोकर, मुखेड आणि अर्धापूर तालुक्यातील प्रत्येकी १ गाव फ्लोराईडने बाधित असल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे फ्लोराईडवर सध्यातरी कुठलाही ईलाज नाही़ परंतू ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण करुन त्यांना फ्लोराईडयुक्त पाण्याचे धोके समजावुन सांगावे लागणार आहे़ पाणी नमुन्यात आढळलेल्या फ्लोराईडमुळे फ्लोरोसीस सारख्या घातक आजाराचा या गावातील ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे़
जमिनीतील पाण्याची काळजी कोणाला ?
पाण्याचा वारेमाप उपसा आणि दुसरीकडे दिवसेंदिवस पावसाचे कमी होत असलेल प्रमाण यामुळे भूजल पातळी खालावत आहे़ त्यातूनच फ्लोराईडयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे़ ज्या पाण्यामध्ये फ्लोरीनचे प्राकृतिक तत्व आढळून येतात त्यालाच फ्लोराईड म्हटले जाते़ हे फ्लोराईड पाण्याबरोबरच मातीतील विविध स्तरात आढळून येतात़ फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे विशेषत: दातांचे आरोग्य संकटात सापडते़ याबरोबरच पोटासंबंधीचे विविध आजार उद्भवतात़ या पाण्यामुळेच शरीरातील हाडे कमजोर होतात तसेच दातांना पिवळेपणा येतो़ त्यामुळे फ्लोराईडयुक्त पाण्याचा वापर आरोग्यासाठी धोकादायक आहे़ या पार्श्वभूमीवर फ्लोराईड बाधीत नमुने आढळलेल्या जिल्हयातील ५३ गावांनी पिण्याच्या पाण्यासंबंधी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे़ प्रशासनही या दृष्टीने प्रयत्नशील आहे़

Web Title: 53 villages of Nanded district have a risk of fluoride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.