कंधार तालुक्यातील ५४ शाळा क्रीडांगणाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:38 AM2018-12-06T00:38:34+5:302018-12-06T00:40:37+5:30
नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही.
कंधार : तालुक्यात जि.प.शाळांची संख्या १८८ आहे. नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही. त्यामुळे खेळाचा आनंद लुटता येत नाही.
तालुक्यातील जि.प.शाळा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांना मोठा आधारवड देणारे, संस्कारमय, नीतिमूल्ये संवर्धन केंद्र मानले जाते. परंतु, या शाळा नानाविध भौतिक सुविधेअभावी चर्चेत येत असल्याचे चित्र आहे. ८५९ वर्गखोल्या असलेल्या या शाळा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त, धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पालकांना शेती, मजुरीपेक्षा सारे लक्ष शाळेतील मुलांकडे देण्याची वेळ आली आहे. त्यातच अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करण्यासाठी मैदानाचा अभाव असल्याने नवीन भर पडली आहे.
तालुक्यातील ५४ शाळेला क्रीडांगण नाही. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठा वाव असतो. सुप्तगुणांचा विकास, नेतृत्व, सांघिक भावना, खिलाडूवृत्ती, रोग प्रतिकार शक्ती वाढते, राष्ट्रीय एकात्मता, भावनिक विकास, शारीरिक क्षमतेचा विकास, निर्णय क्षमतेचा विकास आदी गुणांचा विकास होतो. शालेयस्तरावर मूलभूत कौशल्य शिकून खेळातील नवीन तंत्रे अवगत करत देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करता येते. आपल्या आवडीनुसार खेळ निवडून प्रावीन्य संपादित करता येते.
खेळ कौशल्याचा पाया शालेयस्तरावर घातला जातो. परंतु मैदान नसल्याने खेळात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. अशीच स्थिती या शाळेतील विद्यार्थ्यांची झाली आहे. आॅलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा महोत्सवात भारताची स्थिती समाधानकारक नाही.
मैदान असले तर क्रीडा साहित्य नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओढाताण होते. क्रीडा मार्गदर्शक योग्य मिळण्याची सोय नाही. मग क्रीडांगण नसेल तर सराव कसा करायचा? हा खरा प्रश्न आहे.
शाळांच्या समस्या संपेनात !
एकीकडे मैदान नसताना जि.प.च्या ९९ शाळांना सरंक्षक भिंत नाही. रात्री मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनण्याचा धोका वाढला आहे. वृक्ष लागवड केली ; पण त्याचे संवर्धन करणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना जशा समस्या भेडसावत आहेत. तसेच ९० पेक्षा अधिक जि.प. शाळेत कार्यालय, भांडार व मुख्याध्यापक खोली नसल्याने अडचणीचा ससमिरा सहन करावा लागत आहे. खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा पायाभूत भौतिक सुविधेत जरा बºया आहेत. परंतु खाजगी अनुदानित ८४ शाळेपैकी काही शाळेला संरक्षक भिंत नाही. तसेच मोजक्या शाळेला क्रीडांगण नाही.