एसटीच्या ५५ हजार फेऱ्या लवकरच धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:13 AM2021-06-23T04:13:25+5:302021-06-23T04:13:25+5:30
राज्यात काेराेनापूर्वी दरदिवशी एसटीच्या ८५ हजार फेऱ्या हाेत हाेत्या. सध्या लांब पल्ला, जिल्हा ते तालुका आणि तालुका ते तालुका, ...
राज्यात काेराेनापूर्वी दरदिवशी एसटीच्या ८५ हजार फेऱ्या हाेत हाेत्या. सध्या लांब पल्ला, जिल्हा ते तालुका आणि तालुका ते तालुका, अशा सुमारे ३० हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याला प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही. हा प्रतिसाद वाढताच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढील टप्प्यात तालुका ते व्यापारी केंद्र असलेली बाजाराची माेठी गावे व नंतर गाव ते गाव एसटीने जाेडले जाणार आहे. गावागावांत जाणारी एसटी फेरीच बंद असल्याने त्या माध्यमातून जाणाऱ्या वृत्तपत्रांची पार्सलेही सुमारे दीड वर्षापासून जाणे बंद आहे; परंतु पुढील दाेन आठवड्यांत एसटी गावागावांत पाेहाेचणार असून, वृत्तपत्रांचे पार्सलही गावात पाेहाेचण्याचा मार्ग सुकर हाेणार आहे.
प्रतिकिमी २२ रुपयांचे डिझेल
प्रवासी नसल्याने एसटीच्या फेऱ्या वाढविणे व्यवहार्य नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. डिझेलचे दर ९० रुपयांवर गेले आहेत. एसटीला प्रतिकिमी २० ते २२ रुपयांचे डिझेल लागते आहे. कामगार- कर्मचारी तेवढेच आहेत, कमी प्रवाशांत एसटी चालविली तरी नुकसान आहे. खर्च तेवढाच आणि उत्पन्न कमी अशी स्थिती आहे.
उत्पन्न २२ काेटींवरून साडेसात काेटी
एसटी महामंडळ आधीच प्रचंड ताेट्यात आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून काेराेनामुळे एसटी जवळजवळ बंदच असल्याने हा ताेटा वाढला आहे. एसटीचे पूर्वी दर दिवशीचे उत्पन्न २२ काेटी एवढे हाेते. आता अनलाॅकनंतर ३० हजार फेऱ्या सुरू झाल्याने हे उत्पन्न साडेसात काेटीपर्यंत पाेहाेचले आहे.
काेट......
प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. या माध्यमातून एसटीचा ताेटा कमी करण्याचा प्रयत्न आहे. ३० हजार फेऱ्या सध्या सुरू आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून लवकरच उर्वरित ५५ हजार फेऱ्याही सुरू केल्या जाणार आहेत.
- संजय सुपेकर,
महाव्यवस्थापक,
एसटी वाहतूक, मुंबई-२