योजनांचे ६० कोटी रुपये अखर्चित -चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:21 AM2019-01-17T01:21:09+5:302019-01-17T01:21:23+5:30
जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़
नांदेड : जिल्ह्यातील सर्वसाधारण, नावीन्यपूर्ण, आदिवासी आदी विविध योजनांचे २०१८-१९ या वर्षातील तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली आहे़ अखर्चित असलेला हा निधी येत्या दोन महिन्यांत कसा खर्च करणार? असा सवाल करीत यासाठी दोषी असलेल्यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़
पत्रपरिषदेत खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ १५ तालुक्यांनी नोव्हेंबरमध्येच पाणीटंचाईचा आराखडा पाठविला होता़ परंतु, फेब्रुवारी उजाडत आला तरी, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही़
विहीर अधिग्रहण, टँकर यासारख्या उपाययोजनांसाठी अक्षम्य दिरंगाई करण्यात येत आहे़ प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे उपाययोजना कधी करणार? अन् पाणी उपलब्ध कधी करुन देणार हा खरा प्रश्न आहे़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियोजन विभागाच्या बैठकीत तब्बल १७२ ट्रान्सफार्मर बंद असल्याचा खुलासा केला़
या ट्रान्सफार्मरच्या दुरुस्तीचे काय? यावर मात्र अधिकाºयांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत़ विविध योजनांचे तब्बल ६० कोटी रुपये अखर्चित आहेत़ एवढे महिने प्रशासनाने नेमके केले तरी काय? अखर्चित असलेले हे ६० कोटी दोन महिन्यात कसे खर्च करणार? आमच्या काळात पुनर्विनियोजनासाठी २ ते ३ कोटी शिल्लक राहत असत. परंतु यावेळी तब्बल २० कोटी रुपये राहिले आहेत़ त्यामुळे या निधीचा अपहार होण्याची दाट शक्यता आहे़ सर्व महत्त्वाच्या योजनांना बगल देण्यात आली असून हे जिल्ह्यासाठीचे मोठे अपयश असल्याचेही खा़चव्हाण म्हणाले़ त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे चव्हाण म्हणाले़ तर दुसरीकडे अप्पर पैनगंगेचे पाणी पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ या निर्णयाला आम्ही विरोध दर्शविला आहे़ कारण त्यामुळे नांदेडसह शेजारील जिल्ह्यांचे नुकसान होणार आहे़
भाजपा सरकारने साडेचार वर्षांत केवळ थापा मारण्याचेच काम केले आहे़ पुढचे काही महिने तर थापा मारण्याची संख्या आणखी वाढणार असल्याचेही ते म्हणाले़