इमारत बांधकामावरील ६५ वर्षीय वॉचमनचा गळा आवळून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:54 PM2020-11-21T16:54:31+5:302020-11-21T16:56:34+5:30
देगलूरनाका भागात जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय परिसरातील घटना
नांदेड- जुन्या नांदेडातील देगलूरनाका भागात असलेल्या जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या निवासी गाळे बांधकामावर कार्यरत ६५ वर्षीय वॉचमनचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
देगलूरनाका भागात जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आहे. या रूग्णालयाच्या बाजूलाच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासी गाळे बांधण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या ठिकाणी ठेकेदाराकडून खाजगी वॉचमन म्हणून नवीन नांदेडातील वसरणी येथील बाबाराव रानबाजी गजभारे वय ६५ हे गेल्या पाच वर्षांपासून काम करीत होते. २४ तास ते तिथेच रहायचे. शुक्रवारी रात्रीही ते तेथेच होते. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह तेथील एका खोलीत आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाबाराव गजभारे यांचा गळा आवळून खून केल्याची बाब पुढे आली आहे.
घटना समजताच इतवारा विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, इतवारा ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे घटनास्थळी पोहोचले. ठसेतज्ज्ञ, डॉग स्कॉडच्या माध्यमातून तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी हे कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरच गजाआड होतील असे पोलीस निरीक्षक नरवाडे यांनी सांगितले. मयत बाबाराव गजभारे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.