शहराला ६५० काेटी; पण गल्लीबाेळांत किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:05+5:302021-08-29T04:20:05+5:30
फाेटाे : महापाैर, आयुक्त आणि वाॅर्डांतील समस्या राजेश निस्ताने नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी ६५० काेटी रुपये निधी ...
फाेटाे : महापाैर, आयुक्त आणि वाॅर्डांतील समस्या
राजेश निस्ताने
नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी ६५० काेटी रुपये निधी देण्याची घाेषणा करण्यात आली असली तरी आपल्या गल्लीबाेळांतील रस्ते, नाल्या, पथदिवे यासाठी खराेखरच काही निधी वाट्याला येणार आहे का? असा सवाल विविध नगर-काॅलन्यांमधून विचारला जात आहे. नांदेड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवारी ‘लाेकमत’ चमूने प्रातिनिधिक स्वरूपात काही नगर-काॅलन्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली, त्यांच्या वाॅर्डातील अडीअडचणी जाणून घेतल्या. तेव्हा अनेक तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिलासुद्धा बाेलत्या झाल्या. त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. यावेळी काहींच्या भावना महानगरपालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी, प्रशासन, आपल्या भागातील नगरसेवक, एवढेच नव्हे, तर सभागृहात बाेटचेपी भूमिका घेणाऱ्या विराेधी पक्षांबाबतही संतप्त हाेत्या.
पालकमंत्र्यांच्या कारभारावर समाधानी
विशेष असे, पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्याबाबत फारसा कुणाचाही राेष दिसला नाही. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, जिल्ह्यात काँग्रेसचे पालकमंत्री, मनपात काँग्रेसची सत्ता तरीही शहरातील अनेक नगर-काॅलन्या अद्याप विकासापासून दूर आहेत. पालकमंत्री निधी खेचून आणतात. मात्र, मनपातील राजकीय व प्रशासकीय यंत्रणा याेग्य अंमलबजावणी करीत नसल्याने ती कपाळकरंटी ठरत असल्याचा सूर ऐकायला मिळाला. ६५० काेटींचा विकास निधी शहरासाठी जाहीर झाला. त्यातील १५० काेटींची कामे महापालिकेमार्फत हाेणार आहेत; परंतु त्यातून प्रत्यक्ष नगर-काॅलन्यांमधील गल्लीबाेळांतील विकासासाठी निधी मिळणार आहे का, की यावेळीसुद्धा प्रमुख रस्ते व आधीच विकसित असलेल्या क्षेत्राला पुन्हा हा निधी देऊन इतरांची बाेळवण केली जाणार आहे, असा मुद्दा उपस्थित केला गेला.
कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम
महानगरपालिकेची राजकीय व प्रशासकीय यंत्रणा ठरावीक क्षेत्राला महत्त्व देत असल्याने इतर परिसर विकासापासून दूर आहे. आजही अनेक भागांत साधे रस्ते, नाल्या नाहीत. नाल्या आहेत, तर त्या पावसाळ्यातसुद्धा तुंबलेल्या आहेत. कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न कायम आहे. त्यातूनच आराेग्याच्या समस्या निर्माण हाेत आहेत.
महापाैर प्रभागाबाहेर जात नाहीत
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची राजकीय धुरा महापाैर माेहिनी येवनकर, तर प्रशासकीय धुरा आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांच्या हाती आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिकेच्या या धुरकरी मंडळीचे अनेक वाॅर्ड-प्रभागांना दर्शनही झाले नाही. महापाैर आपले राजकीय अस्तित्व असलेल्या प्रभागापुढे जात नसल्याचा सूर आहे. विषय समिती सभापती आणि बहुतांश नगरसेवकांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. काेराेना या संकटाच्या काळात, तर नागरिकांना आपल्या नगरसेवकांचेही दर्शन दुर्लभ झाले हाेते. काही नगरसेवक त्याला अपवाद असले तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.
१५० काेटींच्या नियाेजनाचे निर्देश
महापाैर व आयुक्तांचा कारभार मर्यादित झाल्याची नागरिकांमधील ओरड पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्याही कानापर्यंत गेली. त्याची तातडीने दखल घेऊन ना. चव्हाण यांनी महापाैर व आयुक्तांना शहरात फेरफटका मारण्याचे, महापालिकेला दिल्या जाणाऱ्या १५० काेटींच्या विकास निधीचे नियाेजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शुक्रवारी महापाैर व आयुक्तांनी गणेशनगर, आंबेडकरनगर या आपल्या भागात भेटी दिल्याचे माहिती आहे. किमान आतातरी ही प्रमुख मंडळी इतर नगरसेवकांच्या प्रभागात भेटी देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
पालकमंत्र्यांना खंबीर साथ हवी
एकूणच नांदेड शहराच्या विकासासाठी पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कमालीची धडपड पाहायला मिळते. ते निधीही शहरासाठी खेचून आणतात. मात्र, महापालिकेतील राजकीय व शासकीय यंत्रणेकडून त्यांना खंबीरपणे याेजनांच्या अंमलबजावणीसाठी साथ मिळत नसल्याचे चित्र आहे.
चाैकट....
शिवसेनेचे आमदार अद्याप जमिनीवर
\Iनांदेड उत्तर मतदार\I संघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर अद्याप जमिनीवर असल्याचा सूरही नागरिकांमधून ऐकायला मिळाला. कारण ते आमदार झाले तरी अद्यापही नगरसेवकांप्रमाणे नागरिकांच्या एका फाेनवर काेणत्याही गल्लीबाेळांत अडीअडचणी साेडविण्यासाठी तत्परतेने हजर हाेतात. त्यांचा आदर्श महापालिकेच्या नगरसेवकांनी घेतला पाहिजे, असा सल्लाही नागरिकांमधून दिला जात आहे.