नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM2019-04-19T00:44:56+5:302019-04-19T00:47:28+5:30
लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले.
नांदेड: लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. सकाळी आठ वाजेपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या़ नांदेड लोकसभेसाठी ६५.१५ टक्के मतदान झाले़ आदर्श मतदान केंद्रावर मतदारांचे तरुणींनी औक्षण करुन स्वागत केले़ तर सखी मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉर्इंट उभारण्यात आला होता़
सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’
प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती. फेसबुकवर अनेकजण सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविल्याचे फोटो अपलोड करीत होते़ तर काहींनी चक्क ईव्हीएमद्वारे कुणाला मतदान केले याचे फेसबुक लाईव्ह केल्याचा प्रकार पुढे आला़
चव्हाणांचे सहकुटुंब मतदान
माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी पत्नी आ़अमिताताई चव्हाण यांच्यासह आंबेडकर नगर भागातील मनपा शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला़ सकाळी दहा वाजता त्यांचे मतदान केंद्रावर आगमन झाले़ यावेळी त्यांच्यासोबत इतर पदाधिकारीही होते़
पहिल्या मतदानासाठी वेळेपूर्वीच केंद्रावर
लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदानाचा अधिकारी मिळाला़ त्यामुळे खुप एक्साईटमेंट होती़ त्यामुळे सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच मी मतदान केंद्रावर हजर होते़ मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचाली मी नजरेने टिपत होती़ आपण आज पहिले मतदान करणार म्हणून अभिमानही वाटत होता़ लोकशाही सदृढ करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजाविलाच पाहिजे़ युवक-युवतींनीही राजकारणात पुढे येवून आपले प्रश्न सोडविण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया रोशनी राजपूतने दिली़
१०४ वर्षाच्या आजीबार्इंचे मतदान
शहरातील यशवंतनगर भागात असलेल्या राणी लक्ष्मीबाई शाळेच्या बुथ क्रमांक २०० वर १०४ वर्ष वय असलेल्या वेणूबाई गणपती फुके या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजाविला़ चालता येत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आॅटोतून त्यांना मतदान केंद्रावर आणले होते़ केंद्राबाहेरच आॅटो उभा करावा लागल्याने नातेवाईकांनी वेणूबाई यांना उचलून घेवून मतदान केंद्रात नेले़ मतदानानंतर वेणूबाई यांनी आपण प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावित असल्याचे सांगितले़