चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या ६६ वर्षीय नराधमास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 06:54 PM2022-02-02T18:54:53+5:302022-02-02T18:55:11+5:30
वृद्धाने बालिकेवर स्वतःच्या घरात नेऊन केला अत्याचार
नांदेड: पावणेचार वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी विशेष न्यायालयाने सात साक्षीदार तपासून न्या. रविंद्र पांडे यांनी ६६ वर्षीय आरोपीस अडीच वर्षे सक्तमजुरी व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. अत्याचाराची ही घटना ३ सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती. सुरेश विठ्ठल लांडगे असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबातील पावणेचार वर्षीय बालिकेचे शेजारील लांडगे कुटुंबाच्या घरी येणे जाणे असे. ३ सप्टेंबर २०१९ रोजी बालिका शेजारील घरी गेली. यावेळी तेठीन ६६ वर्षीय सुरेश विठ्ठल लांडगे याने तिला घरात घेत दार लावून घेतले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पाहिला आणि बालिकेच्या आईला सांगितला. बालिकेची आई सुरेशच्या घरी गेली असता त्यांना धक्का बसला. सुरेशने बालिकेवर अत्याचार केल्याचे दिसून आले.
त्यानंतर सुरेश लांडगे याच्याविरूद्ध (गुरनं-४३२/२०१९) गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रारंभी, याप्रकरणाचा तपास महिला पोउपनि. एस. ए. कदम व नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी केला. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात विशेष न्यायालयाने सात साक्षीदार तपासून न्या. रविंद्र पांडे यांनी १ फेब्रुवारी रोजी आरोपी सुरेशला अडीच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू ऍड. एम. ए. बत्तुला यांनी मांडली आहे.