सखी वन स्टाॅप सेंटरद्वारे ६७ पीडितांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:04+5:302021-01-16T04:21:04+5:30
नांदेड : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘सखी वन स्टाॅप सेंटर’द्वारे आतापर्यंत ...
नांदेड : महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘सखी वन स्टाॅप सेंटर’द्वारे आतापर्यंत ६७ पीडितांना आधार देऊन त्यांच्या न्यायालयीन लढाईसाठी बळ दिले आहे.
केंद्र शासनाची योजना असलेल्या सखी वन स्टाॅप सेंटरची स्थापना नांदेड शहरातील शास्त्रीनगर परिसरातील एका इमारतीत करण्यात आली. एखाद्या अन्यायग्रस्त महिला किंवा मुलीला एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर मदत, समुपदेशन व गरज असल्यास आश्रयाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशानेच महिला व बालविकास मंत्रालयाकडून २०१७मध्ये हे केंद्र स्थापन करण्यात आले. नांदेड येथे या केंद्राकडून ६७ पीडितांना आधार दिल्याची नाेंद आहे.
कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना
शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, काैटुंबिक छळ, ॲसिड हल्ला, सायबर क्राईमधील पीडिता किंवा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जावून कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता या पीडितेची नसते. नांदेड येथे असलेल्या सखी वन स्टाॅप सेंटरमध्ये सर्वाधिक तक्रारी या काैटुंबिक हिंसाचार पीडितेच्या आहेत.
पीडितेला पाच दिवसासाठी आश्रम
सखी वन स्टाॅप सेंटरसाठी जिल्हा स्तरावर एक समिती असून, त्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. तर पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद पंचायत विभाग सभापती, जिल्हा संरक्षण अधिकारी व तीन अशासकीय सदस्य या समितीत आहेत. पीडित महिलेला याठिकाणी पाच दिवस आश्रय दिला जातो, अशी माहिती समितीच्या सदस्य सचिव पी. जी सोनकांबळे यांनी दिली.
चौकट-
सखी वन स्टाॅप सेंटर अंतर्गत प्रत्येक तालुक्याला संरक्षण अधिकारी असून, ते समितीला प्रत्येक महिन्याला किंवा त्रैमासिक आढावा देतात. नांदेड जिल्ह्यात काैटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना आहेत.
सखी वन स्टाॅप सेंटरसाठी येथील तहसील कार्यालयामागे जागा मिळाली असून, या इमारतीसाठी ४९ लाख मंजूर झाले आहेत. मात्र, हे काम रेंगाळल्यामुळे भाड्याच्या खोलीत हे सेंटर सुरू आहे.