भोकर तालुक्यातील जि़प़ शाळांच्या ६९ वर्गखोल्या मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:13 AM2018-03-05T00:13:04+5:302018-03-05T00:13:12+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ६९ वर्गखोल्या मोडकळीस आल्याने येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ६९ वर्गखोल्या मोडकळीस आल्याने येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२५ शाळांत ११९९२ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. यातील ४१ शाळेअंतर्गत उपलब्ध वर्गखोल्यांतील ६९ वर्गखोल्या जुने बांधकाम असल्यामुळे पडझड होवून मोडकळीस आल्या आहेत. काही शाळांची टिनपत्रे जीर्ण झाली आहेत. तर काही शाळांच्या छताला गळती लागली आहे. तसेच भिंतीला भेगा पडल्या आहेत. बहुतांश शाळेला संरक्षक भिंत नसल्याने पशुंचा वावर वाढला आहे.अशाही परिस्थितीत येथील कार्यरत शिक्षक एकाच खोलीत दोन किंवा अधिक वर्गाचे विद्यार्थी बसवून अध्यापन करतात. तर काही शाळांत पर्याय नसल्यामुळे मोडकळीस आलेल्या खोलीतच शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात पडझड झालेल्या वर्गखोल्या बांधून विद्यार्थ्यांना सुरक्षित शाळा मिळावी अशी अपेक्षा पालक करीत आहेत.
याबाबत गटशिक्षणाधिकारी डी.जी.पोहणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात आ.अमिताताई चव्हाण यांनी शाळेच्या इमारतीची व मोडकळीस आलेल्या वर्गखोलीची माहिती मागितली होती. त्यानुसार त्यांना व जिल्हा परिषद शिक्षण विभागास माहिती दिली आहे.
वरिष्ठ स्तरावर याबाबत निर्णय होईल.
तालुक्यातील ४१ शाळांतील २६, आणि ८ शाळांत २ तसेच ४ शाळांत ३ वर्गखोल्यांची पुनर्बांधणी होणे आवश्यक असून थेरबन येथे ४ व खरबी येथे ६ वर्गखोल्या मोडकळीस आल्यामुळे येथेही पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. तर भोकर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
हस्सापूर येथे उपलब्ध असलेल्या तीनही वर्गखोल्यांची पडझड झाल्यामुळे येथील मुख्याध्यापक विठ्ठल पुजरवाड यांनी शिक्षण विभागाकडे शाळा बांधकामाची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून इमारत बांधकामाची आवश्यकता असल्याचे पत्र दिले आहे.