नांदेड जिल्ह्यातील ७० जिल्हा परिषद शाळा सोमवारपासून उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 PM2020-11-20T17:00:04+5:302020-11-20T17:02:13+5:30
मार्च २०२० पासून कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नांदेड : जिल्ह्यात कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू करण्यासाठी हालचाली होत आहेत. राज्य शासनाच्या सुचनेनंतर इयता नववी व दहावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात ७० जिल्हा परिषदेच्या शाळा उघडणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.
मार्च २०२० पासून कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचवेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांची संमतीही घेतली जाणार आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संकटात किती पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी संमती देतील? याकडेही लक्ष लागले आहे. कोरोनाचे मोठे संकट आहे. दुसऱ्या लाटेचीही भीती आहेच. या पार्श्वभूमीवर पालकांनी योग्य खबरदारी घेवून मुलांना शाळेत पाठवावे. शाळेतील शिक्षकांशी समन्वय राखावा. यातूृन कोरोना रोखण्यासाठी मदत होईल, असे शिक्षणाधिकारी दिग्रसकर म्हणाले.
निर्जंतुकीकरण, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन
जिल्ह्यात इयता नववी व दहावीच्या शाळा सुरू होणार आहेत. या शाळा सुरू झाल्यानंतर निर्जंतुकीकरण आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे पालन होईल. कोरोना संशयितांनाही वेळीच उपचार दिले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.
शिक्षण विभागाकडून ७० शाळांचा आढावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या शाळा संदर्भात जिल्ह्यातील सर्व ७० शाळांचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. यावेळी कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
कोरोना संकटामुळे संपूर्ण जग हतबल झाले होते. शाळाच नव्हे तर संपूर्ण जग थांबले होते. शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन प्रणाली वापरली जात आहे. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे धोकादायकच आहे. पाल्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा विचार पालक करु शकणार नाही.
- रवींद्र जोशी, पालक
कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यातून विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण प्राप्त होत नाही. त्यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घेत मुलांना शाळेत पाठवणे योग्य राहील. शाळा प्रशासनालाही कोरोनाच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करणे बंधनकारक आहेच. पण पालक म्हणून काळजी आहेच. - अंशुमन नांदेडकर, पालक