नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची ७३ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:23 AM2018-10-14T01:23:17+5:302018-10-14T01:23:34+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आदिवासी प्रकल्पामधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिली असली तरी नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले आहे़ आदिवासी किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ७३ पदे रिक्तच राहणार असून या भागातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आदिवासी प्रकल्पामधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिली असली तरी नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले आहे़
आदिवासी किनवट तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची ७३ पदे रिक्तच राहणार असून या भागातील नागरिकांनी या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला़
आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत असल्यामुळे नीती आयोगाचे महत्त्वाकांक्षी जिल्हे नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशिम तसेच डावी कडवी विचारसरणी यामधील गोंदिया, चंद्र्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही भाग, पालघर संपूर्ण जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांतील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे १ नोव्हेंबर २०१८ पासून भरण्यास शासन मंजुरी देत आहे़ मात्र या निर्णयात जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्याचा समावेश नसल्याने किनवट तालुक्याला का वगळले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
किनवट तालुक्यातील ७१ अंगणवाड्यातील २ हजार ५०० बालकांना व ९०० गरोदर स्त्रिया, स्तनदामाता या एकवेळ चौरस आहार व बालकांना चार दिवस केळी, अंड्यापासून वंचित राहावे लागत आहे़