महसुली गतीसाठी मराठवाड्यात मंडळ अधिकारी, तलाठ्यांच्या ७९९ पदांची होणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 04:27 PM2022-12-10T16:27:01+5:302022-12-10T16:27:39+5:30
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता.
नांदेड : महसूल प्रशासनाने नव्याने निर्माण केलेल्या तलाठी सज्जा आणि महसूल कार्यालयांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला असून, या निर्णयानुसार मराठवाड्यात ७९९ पदांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ‘महसूल’च्या कामकाजाला गती मिळणार आहे.
महसूल विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तलाठी सज्जा आणि मंडळांची पुनर्रचना करण्यात आली होती. यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये नव्याने तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयांची निर्मिती केली होती. मात्र, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदे मंजूर केली नव्हती. त्यामुळे आहे त्याच तलाठ्यांकडे दोन ते तीन तलाठी सज्जा देऊन कामकाज चालविले जात होते. परिणामी तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार निर्माण झाला होता. नवीन तलाठी सज्जांच्या ठिकाणी पद निर्मिती करावी, अशी मागणी वारंवार केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी हा आदेश काढला आहे.
तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रशासनाचा दुवा,असे संबोधले जाते; परंतु या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला होता. नवीन पदनिर्मिती होऊन पदभरती झाल्यानंतर हा ताण कमी होणार आहे.
नवीन तलाठी सज्जा; काम मात्र जुनेच
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तलाठी सज्जांची पुनर्रचना करून नव्याने तलाठी सज्जांची निर्मिती केली होती; परंतु त्या ठिकाणी काम करण्यासाठी तलाठी पदाची भरती करण्यात आली नाही. तत्पूर्वी पदनिर्मिती करणे आवश्यक होते. त्यामुळे सध्या तरी एका तलाठ्याकडे ३ ते ४ सज्जांचा कारभार देऊन महसूलचे काम भागविले जात होते.
कोणत्या जिल्ह्यात किती पदांची होणार निर्मिती?
जिल्हा तलाठी मंडळ अधिकारी
औरंगाबाद ११७ १९
जालना ८० १३
परभणी ७६ १३
हिंगोली ६१ १०
बीड १३८ २३
नांदेड ८४ १४
लातूर ३९ ०७
उस्मानाबाद ९० १५
एकूण ६८५ ११४