८ महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह चिमुकलीची हत्या; मुलगी नको म्हणून प्रकार घडल्याचा संशय
By प्रसाद आर्वीकर | Published: September 13, 2023 03:47 PM2023-09-13T15:47:16+5:302023-09-13T15:47:34+5:30
आरोपी पती भारतीय सैन्य दलात सेवेत असून तो स्वतःहून पोलीस ठाण्यात गेला
- मारोती चिलपिपरे
कंधार : आठ महिन्याच्या गरोदर पत्नीसह ३ वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना कंधार तालुक्यातील बोरी खु येथे १३ ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरुन या हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीने स्वत: माळाकोळी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. आरोपी भारतीय सैन्य दलात सेवेत आहे.
एकनाथ जायभाये असे आरोपीचे नाव असून, भाग्यश्री जायभाये आणि सरस्वती जायभाये असे हत्या झालेल्या मयत पत्नी आणि मुलीचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे आरोपी एकनाथ जायभाये याने त्याची पत्नी भाग्यश्री आणि मुलगी सरस्वती या दोघांचा गळा आवळून खून केला आणि तो घरातून निघून गेला. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याने भाग्यश्री हिच्या माहेरी मुलीची हत्या केल्याची माहिती त्याने स्वत:च दिली. त्यानंतर आरोपी एकनाथ जायभाये थेट माळाकोळी पोलिस ठाण्यात दाखल झाला आणि पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या प्रकरणी दैवशाला व्यंकटी केंद्रे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. घर बांधकामासाठी माहेरहून ४ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती. त्यावर माहेरच्या मंडळींनी भाग्यश्री हिच्या सासरी जाऊन समजून काढली. परंतु, तिचा छळ कमी झाला नाही. भाग्यश्री ही दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर ३ महिन्यांपासून पती एकनाथ, सासरा मारोती, सासू अनुसया जायभाये व दीर दयानंद हे तुला दुसरी पण मुलगीच आहे. तु चेक करण्यास दवाखाण्यात चल, असे तगादा लावत होते. मात्र भाग्यश्री तपासणी करण्यास तयार नव्हती. तेव्हापासून अधिकच छळ केला जात होता.
त्यातच १३ सप्टेंबर रोजी भाग्यश्री एकनाथ जायभाये व सरस्वती एकनाथ जायभाये यांचा गळा दाबून खून केला. दुसरी मुलगी नको, तू डॉक्टरकडे चेकअप कर व माहेरहून ४ लाख रुपये घेऊन ये म्हणून हा खून केल्याची तक्रार भाग्यश्री जायभाये यांची आई दैवशाला व्यंकटी केंद्रे यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यावरुन आरोपी पती एकनाथ मारोती जायभाये याच्यासह सासरे मारोती रामकिशन जायभाये, सासू अनुसया मारोती जायभाये, दीर दयानंद मारोती जायभाये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.