डमी परीक्षार्थी प्रकरणात एसआयटीकडून आणखी आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:19 PM2018-05-07T19:19:32+5:302018-05-07T19:19:32+5:30
राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़
नांदेड : राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणात विशेष तपास पथकाने आणखी आठ आरोपींना अटक केली आहे़ या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे़.आज त्यांना नांदेड न्यायालयात आणण्यात आले होते़ परंतु हे प्रकरण सुुरवातीपासून किनवट न्यायालयात सुरु असल्याने सर्व आरोपींना दुपारी किनवट न्यायालयात पाठविण्यात आले़
एमपीएससी डमी परिक्षार्थी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून या प्रकरणात आतापर्यंत एकुण ३४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत़ मांडवी येथील युवक योगेश जाधव याने हा घोटाळा उघडकीस आणला होता़ या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबोध राठोड याला चार महिन्यापूर्वी अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तुरुंगातच आहे़ तर चार जणांना आतापर्यंत जामीन मिळाला आहे़
आज एसआयटीने आणखी आठ जणांना अटक केली़ त्यात लक्ष्मण शंकर चव्हाण, धनराज नरसिंग राठोड, अनिल रावसिंग जाधव, स्वप्नील शिवाजी पवार, सुनिल बन्सी राठोड, कुणाल विनोद राठोड, चंदन केवलसिंघ राठोड, शिवप्रसाद विजय डुमणे यांचा समावेश आहे़ या आरोपींमध्ये तलाठी, लिपीक, कालवा निरिक्षक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्यांचा समावेश आहे़