८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:20 AM2019-06-07T00:20:22+5:302019-06-07T00:21:17+5:30

मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़

8 thousand students get benefit of buses | ८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देमानव विकास : १७ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार बसेसला प्रारंभ

भारत दाढेल ।
नांदेड : मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या हस्ते १७ जून रोजी या योजनेचा प्रारंभ हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा येथून करण्यात येणार आहे़
यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली असून या योजनेतंर्गत ६३ आकाशी रंगाच्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे़ शालेय विद्यार्थिंनींसाठी मोफत बस वाहतूक सुविधेचा लाभ किनवट, हिमायतनगर, भोकर, बिलोली, धर्माबाद, देगलूर, उमरी, मुदखेड, लोहा या तालुक्यातील गावे, वाडी, वस्ती, तांड्यावरील विद्यार्थिंनींना मिळणार आहे़ एकुण ५३० गावातील ८ हजार विद्यार्थिंनी मानव विकासच्या बसेसने शाळेला जाणार आहेत़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांनी या बसेसचा आढावा घेवून मार्गदर्शन केले़ शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बसेस सुरू होतील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे़ याविषयी सर्व आगार प्रमुखांना सूचना दिल्या आहेत़ संबंधित सर्व गटशिक्षण अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यात ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी दक्ष रहावे़ यामध्ये निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व ठरवून दिलेल्या मार्गावर नियमितपणे या आकाशी रंगाच्या बसेस धावतील़ त्यासाठी ६३ बसेसवर महिला वाहक नियुक्त करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़
दरम्यान, पात्र विद्यार्थिंनींच्या याद्या संबंधित सर्व मुख्याध्यापकांनी संबंधित आगार प्रमुख यांच्याकडे सादर कराव्यात, त्यानुसार विद्यार्थिंनींचे मानव विकासचे बस पासेस तयार करून संबंधित आगार प्रमुखांनी यांच्याकडे १७ जून पर्यंत देण्याच्या व सर्व पात्र विद्यार्थिंनींना मानव विकासचे बस पासेस उपलब्ध होतील, याबाबत गटशिक्षण अधिकारी यांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़
यापूर्वी अनेक तालुक्यांना बस नसल्याने मुलींना गर्दीतून प्रवास करून शाळेला जावे लागत होते़ काही गावात बस नसल्याने मुलींना पायपीट करून शाळा गाठावी लागत होते़ त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींची शाळा बंद केली होती़ मात्र आता मानव विकासच्या बसेस मुळे दुर्गम भागातील मुलींना सुद्धा शहरातील शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे़ प्रशासनाने या बसेसवर महिला वाहक ठेवल्याने अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे़ मानव विकास कार्यक्रमातंर्गत सुरू करण्याता येणाºया ६५ बसेस मध्ये विद्यार्थिंनीशिवाय इतर प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार नाही़ शाळेची वाहतूक करीत असताना या बसेस केवळ विद्यार्थिंनींसाठीच उपलब्ध राहतील, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिल्या आहेत़
शालेय विद्यार्थीनींना असा मिळणार लाभ
लोहा तालुक्यातील ४८ गावातील ८९८ विद्यार्थिंनी मानव विकास कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या बसचा लाभ मिळणार आहे. तसेच देगलूर- ५६ गावातील ७४९ विद्यार्थिंनी, बिलोली- ५४ गावातील ७६३,धर्माबाद - २५ गावातील ९९२ विद्यार्थिंनी, उमरी- ६४ गावातील ८६८, मुदखेड-४८ गावातील ६५०, भोकर - ४४ गावातील ९४८, हिमायतनगर- ७६ गावातील ९०३ व किनवट तालुक्यातील १२२ गावातील ८८९ विद्यार्थिंनींना या बसेसचा लाभ मिळणार आहे़

Web Title: 8 thousand students get benefit of buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.