नांदेड जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:31 AM2017-12-07T00:31:29+5:302017-12-07T00:31:40+5:30
नांदेड : महसूल कारभारात गतिमानता आणण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
अनुराग पोवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महसूल कारभारात गतिमानता आणण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी जिल्ह्यात ८४ तलाठी सज्जे आणि १४ महसूल मंडळांची नव्याने निर्मिती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
राज्यात महसूल मंडळाची पुनर्रचना करण्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल कार्यालयाच्या कामात झालेली वाढ विचारात घेता नवे महसूल मंडळ आणि तलाठी सज्जे निर्मिती आवश्यक होती. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही कार्यवाही करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात ६ तलाठी सज्जा मागे एक मंडळ कार्यालय याप्रमाणे १४ नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले. नांदेड, भोकर, देगलूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, कंधार या उपविभागांनी नवीन मंडळ निर्मितीबाबतचा आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार ८४ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रात ३, नगरपालिका क्षेत्रात १, नगरपंचायत क्षेत्रात ६, ग्रामीण क्षेत्रात ६२ आणि आदिवासी क्षेत्रात १२ तलाठी सज्जे वाढले आहेत. तलाठी सज्जांच्या वाढलेल्या संख्येमुळे १४ महसुली मंडळाच्या निर्मितीसही शासनाने मान्यता दिली आहे.
नांदेड तालुक्यात नाळेश्वर व वाजेगाव हे नवनिर्मित महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. नाळेश्वर महसूल मंडळात नाळेश्वर, वाघी, पिंपरगाव (को), रहाटी (बु) आणि पुयणी या तलाठी सज्जांचा समावेश करण्यात आला आहे तर वाजेगाव महसूल मंडळात वाजेगाव, पुणेगाव आणि वांगी हे तीन सज्जे राहणार आहेत. कंधार तालुक्यात दिग्रस बु. हे नवे महसूल मंडळ स्थापन झाले असून दिग्रस बु., दिग्रस खु.,हाडोळी ब्र., दैठणा, पानशेवडी व गऊळ या तलाठी सज्जांचा दिग्रस बु. मंडळात समावेश करण्यात आला आहे. लोहा तालुक्यात सावरगाव (न) हे महसूल मंडळ नव्याने स्थापन केले असून त्याअंतर्गत सावरगाव (न), रिसनगाव, आष्टूर, देऊळगाव, धानोरा (म) व आंडगावचा समावेश आहे.
धर्माबाद तालुक्यात सिरजखोड हे महसूल मंडळ नव्याने स्थापन केले. त्याअंतर्गत सिरजखोड, आलूर, नायगाव (ध), बेल्लोर (बु), विळेगाव (थडी) व शेळगाव (थडी)चा समावेश आहे. उमरी तालुक्यातील धानोरा (बु) या नवनिर्मित मंडळात धानोरा (बु), बितनाळ, बोथी, वाघाळा, सोमठाणा व मंडळाचा समावेश आहे. किनवट तालुक्यात सिंदगी (मो) हे नवनिर्मित महसूल मंडळ असून सिंदगी (मो), निचपूर, राजगड, लोणी, कनकवाडी, मारेगाव या तलाठी सज्जांचा समावेश आहे. उमरी बाजार यामध्ये उमरी (बा), बोथी, उनकेश्वर, दरसांगवी, पाटोदा (बु) या मंडळाचा समावेश आहे. देगलूर तालुक्यातही नरंगल (बु) येथे नवीन महसूल मंडळ स्थापन केले आहे. त्याअंतर्गत नरंगल (बु), मंडगी, हिप्पर, चैनपूर, सांगवी (उमर), तमलूर या तलाठी सज्जांना जोडण्यात आले आहे. मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथील नवीन महसूल मंडळास अंबुलगा (बु), गोजेगाव, राजुरा (बु), उंद्री (प.दे.), रावणगाव, हसनाळ तर चांडोळा मंडळात चांडोळा, सलगरा (खु), धामणगाव, बेटमोगरा, हंगरगा (प.कं.), उच्चा या तलाठी मंडळाचा समावेश केला आहे.
भोकर तालुक्यातही भोसी येथे महसूल मंडळ नव्याने स्थापन केले असून भोसी, वागत, चिदगिरी, पांडुर्णा, बेंबर, रिठ्ठा या तलाठी सज्जांचा समावेश केला आहे. बिलोली तालुक्यात रामतीर्थ हे नवे मंडळ स्थापन केले असून रामतीर्थ, अटकळी, चिटमोगरा, केरुर आणि डोणगाव (बु) हे तलाठी सज्जे जोडण्यात आले आहेत आणि नायगाव तालुक्यात घुंगराळा येथे स्थापन केलेल्या नव्या महसूल मंडळात घुंगराळा, कृष्णूर, देगाव, रुई (बु) व बळेगावचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार प्राप्त अधिकारानुसार नांदेड जिल्ह्यातील नवनिर्मिती अधिकारांचा वापर करुन महसूल मंडळे व तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्याबाबत २७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. याबाबत १५ डिसेंबरपर्यंत सूचना, आक्षेप घेता येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितले.
नव्याने निर्माण झालेली महसूल मंडळे
जिल्ह्यात १४ महसूल मंडळे नव्याने निर्माण करण्यात आली आहे. त्यात नांदेड तालुक्यातील नाळेश्वर, वाजेगाव, कंधार तालुक्यातील दिग्रस (बु), लोहा तालुक्यातील सावरगाव (न), धर्माबाद तालुक्यातील सिरजखोड, उमरी तालुक्यातील धानोरा बु., किनवट तालुक्यातील सिंदगी (मु), उमरी (बा), देगलूर तालुक्यातील नरंगल बु., मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु), भोकर तालुक्यात भोसी, बिलोली तालुक्यात रामतीर्थ आणि नायगाव तालुक्यातील घुंगराळा महसूल मंडळाचा समावेश आहे. जिल्ह्यात असलेल्या ८० मंडळामध्ये या १४ नव्या महसूल मंडळाचा समावेश होणार आहे.
वाढीव सज्जा व महसूल मंडळासाठी पदेही मिळणार
जिल्ह्यात वाढलेल्या या ८४ नवीन तलाठी सज्जे व १४ महसुली मंडळासाठी लागणारी पदेही भरावी लागणार आहेत. यासाठी आवश्यक ती पदनिर्मितीही केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. या वाढलेल्या पदामुळे निश्चितच महसूल विभागाच्या कामकाजात गतिमानता येणार आहे. यातून सामान्य जनतेला सुविधा मिळणार आहेत.