८५ वर्षाचा हरा बुढ्ढा पदयात्रेतून करतोय जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:22 PM2019-11-25T18:22:19+5:302019-11-25T18:29:43+5:30
अखेरच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरुच ठेवण्याचा दृढ निश्चय
- शिवराज बिचेवार
नांदेड : गेल्या ५० वर्षापासून पदयात्रा, मंदिरे, शाळा, महाविद्यालय यासह गर्दी जमेल त्या ठिकाणी बेटी बचाव, बेटी पढाव, जलजागृती, वृक्षारोपन अशा विषयावर लोकांच्या मनाला भिडणाऱ्या शब्दात ८५ वर्षांचा हरा बुढ्ढा हा जनजागृती करतोय़ कोणत्याही स्वार्थाविना लोकांना जागे करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरुच ठेवण्याचा दृढ निश्चयही त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता़
जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेले अनंत श्रीनिवासराव करजगीकर यांना समाजसेवेचा बाळकडू त्यांची आई मालतीबाई यांच्याकडून मिळाले़ कुष्ठरोग निर्मुलनासाठी मालतीबाई यांनी देगलूर तालुक्यात मोठे काम केले आहे़ त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गेल्या ५० वर्षापासून अनंत करजगीकर हे राज्यात अनेक ठिकाणी एक रुपयाही मानधन न स्विकारता जनजागृती करतात़ ८५ व्या वर्षातील त्यांचा उत्साह पाहून त्यांना प्रत्येकजण हरा बुढ्ढा या नावानेच ओळखतो़ मालेगाव रस्त्यावरील श्री गजानन मंदिर संस्थानच्या दरवर्षी निघणाऱ्या शेगावच्या पदयात्रेत करजगीकर नित्यनेमाने सहभागी होतात़ हातात बेटी बचाव, बेटी पढाव, जल है तो कल है चे फलक घेऊन ते मार्गातील प्रत्येक ठिकाणी लोकांशी संवाद साधतात़ त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करतात़ आजपर्यंत त्यांचे जवळपास ४०० लेखही प्रकाशित झाले आहेत़
प्रसाद घ्या अन् वृक्षसंवर्धन करा
मालेगाव रोडवरील श्री गजानन महाराज संस्थानात दर गुरुवारी प्रसाद वाटपाची जबाबदारी ही करजगीकर यांच्यावर असते़ आरतीनंतर बाहेर पडणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करतानाही ते वृक्षसंवर्धन करा, बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश देतात़ मंदिरातही त्यांनी ठिकठिकाणी तसे फलक लावले आहेत़ त्याचबरोबर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर असेल त्या ठिकाणी स्वताहून ते उपस्थित राहून लोकांना रक्तदानासाठी आवाहन करतात़ शहरात असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा जनजागृतीचा उपक्रम सुरुच असतो़ त्यामुळे परिसरात आता ते सर्वांना परिचयाचे झाले आहेत़
दिले तर खायचे़
जनजागृतीसाठी फिरत असताना कुणालाही काही मागायचे नाही़ दिले तर खायचे पण तिथे सेवा द्यायची़ असा नियम करजगीकर यांनी स्वत:ला घालून घेतला आहे़ नांदेडात भावाच्या घरी ते राहतात़ जिल्ह्यात माजी खा़डॉ़व्यंकटेश काब्दे यांच्यासोबत काम करताना त्यांनी अनेक मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले होते़त्याचबरोबर कृष्ठरोग निर्मुलन यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत़ नदीजोड प्रकल्पासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे़ हा प्रकल्प शासनाने न राबविता तो लोकांकडून करुन घ्यावा असे करजगीकर यांचे मत आहे़