८८ टक्के पेरण्या आटाेपल्या, साेयाबीनचा पेरा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:42+5:302021-07-04T04:13:42+5:30
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून ...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची ओरड आहे. प्रत्यक्षात पावसाची आकडेवारी तपासली असता जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १५० मिमी पाऊस पडताे; परंतु यावर्षी ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत २२५ मिमी पाऊस झाला आहे. अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रानुसार जिल्ह्यात सरसकट दुबार पेरणीची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. जेथे हलक्या जमिनी आहेत व खूप आधी तेथे पेरणी झाली. त्याच भागात दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. लाेहा, कंधार, मुदखेड व नांदेड तालुक्यातील काही भागात पाऊस कमी पडल्याने व लगतच्या तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास तेथे दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता कृषी सूत्रांनी वर्तविली आहे; परंतु प्रत्यक्षात जिल्ह्याच्या साेळाही तालुक्यांतील शेतकरी दुबार पेरणीचे संकट घाेंगावत असल्याची ओरड करताना दिसत आहेत.
उगवन क्षमतेच्या तक्रारी नाहीत....
गेल्यावर्षी साेयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशा स्वरूपाच्या हजाराे तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या हाेत्या. यावर्षी अद्याप तरी अशा तक्रारी प्राप्त नसल्याचे सांगितले गेले. जमिनीत कमी ओल असताना झालेली पेरणी किंवा अतिवृष्टी यामुळेच बियाणे न उगवण्याच्या तक्रारी वाढू शकतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून कृषी विभागाने शेतकऱ्यांना साेयाबीनचे घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन केले हाेते. जिल्ह्याधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी सुद्धा शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फेसबुक लाइव्हद्वारे घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला दिला हाेता. या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बहुतांश घरच्याच बियाण्याला पसंती दिली आहे. पेरणीआधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहनही शेतकऱ्यांना केले गेले हाेते. सध्या बाजारात तीन ते चार हजार क्विंटल मुबलक साेयाबीन बियाणे उपलब्ध आहे. सुरुवातीला प्रचंड मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्याने गाेंधळ उडाला हाेता; परंतु मध्यंतरी पेरण्या लांबणीवर पडताच पुरवठा पूर्ववत झाल्याने टंचाईची ओरड थांबली.
आंध्रा-तेलंगणातून चाेर बिटी बियाणे.....
कपासीबाबत आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून चाेरट्या मार्गाने एचपी बीटी हे शासनाचे परवानगी नसलेले बियाणे काही भागात आणले जात आहेत. पूर्वी ते माेठ्या प्रमाणात आणले जायचे; परंतु दाेन वर्षांपासून त्याचे फारसे उत्पन्न नसल्याने शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. या बियाणे विक्रीसाठी दलाल सक्रिय आहेत. हदगाव येथे कृषी अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून दलालांशी संपर्क केला व प्रकरण पाेलिसांमार्फत उघड केले. मे व जून महिन्यात बियाण्यांचे नमुने घेण्यात आले. मात्र, ते फेल असल्याबाबत अद्याप काेणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.