नांदेडमध्ये ‘अफू’ विक्रीचे ९ परवाने कायमस्वरूपी रद्द; तरीही एक्साईज, पाेलिसांची नजर चुकवून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 12:47 PM2021-11-27T12:47:26+5:302021-11-27T12:50:37+5:30
स्थानिक पाेलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी अफू बाेंडाचा चुरा विकणाऱ्या नऊ जणांचे परवाने ८ मार्च २०२१ राेजीच कायमस्वरूपी रद्द
नांदेड : ‘एनसीबी’ मुंबईच्या पथकाने नांदेडमध्ये सलग दाेन धाडी घालून अमली पदार्थांची उघड केलेली तस्करी चर्चेत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सात महिन्यांपूर्वीच अफू बाेंडाचा चुरा (पाॅपी स्ट्राॅ) विकणाऱ्या नऊ जणांचा परवाना रद्द केल्याची माहिती हाती आली आहे.
एनसीबीने दाेन आठवड्यांपूर्वी तेलंगाणातून येणारी १ हजार १२७ किलाे गांजाची खेप पकडली हाेती. त्यानंतर गेल्या आठवड्यात एनसीबीने पुन्हा जिल्ह्यातील कामठा येथे धाड टाकून डाेडा हा अमली पदार्थ जप्त केला. कच्चा माल आणून त्याची निर्मिती करणारा कारखानाही उद्ध्वस्त केला. या कारवाईने स्थानिक पाेलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी अफू बाेंडाचा चुरा विकणाऱ्या नऊ जणांचे परवाने ८ मार्च २०२१ राेजीच कायमस्वरूपी रद्द केल्याचे सांगितले. त्यामध्ये नांदेड येथील अजिज अमीरअली देवाणी (इतवारा), बलबीरसिंघ नवाब (शहीदपुरा), इदरसिंघ बुंगई व हरिंदरकाैर शाहू, बालाजी रामचंद्र शिंदे, साहेबराव राठाेड (भाेकर फाटा, ता. अर्धापूर), रशपालकाैर नवाब, सुखदेवकाैर कटाेदिया (कामठा), शैला नरवाडे व पुष्पादेवी व्यास (आनंदनगर) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ९ परवाने (पाॅपी-२) मंजूर आहेत. त्यापैकी ७ परवान्यांचे परराज्यातील एनओसीच्या अटीवर २०२०-२१करिता नूतनीकरण करण्यात आले हाेते. मात्र, त्यांच्या परवान्यावर व्यवहार सुरू केले गेले नाहीत. डाेडा चुरा या अमली पदार्थाची व्यसनाधिनता टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे धाेरण आहे. त्यासाठी तीन वर्षांची कालमर्यादा आहे. त्या अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी रीतसर सुनावणी घेऊन हे नऊ परवाने रद्द केले.
परवाना रद्द, तरीही साठा आढळला
एक्साईजच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी कामठा खु. (जि. नांदेड) येथील सुखदेवकाैर गुलाबसिंघ कटाेदिया यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. त्यानंतरही एनसीबीच्या धाडीत त्यांच्याकडे १११ किलाे पाॅपी स्ट्राॅ व साहित्य आढळले हाेते. यापासून हेराॅईन बनवले जाते. या प्रकरणात चाैघांना अटक केली गेली. एक्साईज व स्थानिक पाेलिसांची नजर चुकवून पाॅपी स्ट्राॅचा साठा व विक्री केली जात असल्याचे एनसीबीच्या धाडीत आढळले.
एक्साईजच्या तपासणीतही गैरप्रकार उघड
नांदेड एक्साईजने कामठाच्या या परवानाधारकाकडे सात महिन्यांपूर्वी भेट दिली असता, त्यांच्या नाेंदवहीमध्ये डाेडा विक्री केलेल्या व्यक्तीचे ओळखपत्र, पत्ता, स्वाक्षरी याचे पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे डाेडा खरेदी केल्याची नाेंद असलेली व्यक्ती प्रत्यक्ष अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.
अफू जप्तप्रकरण: आरोपींना न्यायालयीन कोठडी
नांदेड शहरानजीक कामठा परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका कारखान्यावर छापा मारून एक क्विंटलहून अधिक अफू जप्त केली होती. या प्रकरणात एनसीबीने तिघांना पकडले होते. सुरुवातीला एनसीबी कोठडी सुनावल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने या तिघांची रवानगी तुरुंगात केली आहे.कामठा परिसरात मुंबईच्या एनसीबी पथकाने धाड टाकली होती. या ठिकाणी अफूची पावडर तयार करण्यात येत होती. एनसीबीने नोटा मोजण्याचे मशीन, अफू आणि इतर साहित्य जप्त केले होते. या प्रकरणात हरदयालसिंघ गुलाबसिंघ काठोडीया, जितेंद्रसिंघ भूल्लर आणि जीवनसिंघ अवतारसिंघ चोप्रा या तिघांना पकडले होते. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली आहे.