नांदेड जिल्ह्यात ९ हजार गुरुजी शोधणार शाळाबाह्य मुले; साडेपाच लाख कुटूंबांचे करणार सर्वेक्षण
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: July 4, 2024 07:35 PM2024-07-04T19:35:26+5:302024-07-04T19:36:06+5:30
वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते.
नांदेड : अनियमित व स्थलांतरित कोणतेही मूल शाळेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात तब्बल ९ हजार गुरुजी जिल्ह्यातील ५ लाख ४७ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करणार आहेत.
वीटभट्टी तसेच वाडी, तांड्यावरील तसेच कारखाने व अन्य कुठल्याच ठिकाणची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येते. यावर्षीही तब्बल १५ दिवस शाळाबाह्य शोधमोहीम राबविण्यात येत आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, हा मुख्य उद्देश आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, वीटभट्ट्या, कारखाने, ऊसतोड कामगार तसेच अन्य १२१ ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे.
गतवर्षी सापडली होती ५६ शाळाबाह्य मुले
गतवर्षी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून राबविण्यात आलेल्या शाळाबाह्य मोहिमेत तब्बल ५६ विद्यार्थी शाळाबाह्य सापडली होती. सदर मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठ्यपुस्तके, गणवेश यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.
शाळा सुरू होण्याच्या प्रारंभी मोहीम
यापूर्वीही स्थलांतरित आणि शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात सर्वेक्षण केले जायचे; पण त्यावेळी शाळाबाह्य मुले शोधूनही त्यांना शाळेत टाकण्यासाठी अर्धे शैक्षणिक सत्र संपायचे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी सत्राच्या प्रारंभीच ही शोधमोहीम सुरू केली आहे.
जिल्ह्यात जवळपास ३५० वीटभट्ट्या
नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ४७ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याशिवाय नांदेड शहर व जिल्ह्यात ३५० पेक्षा अधिक वीटभट्ट्या आहेत. तेथे काम करणाऱ्या वीटभट्टी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी या वीटभट्ट्यांवर गुरुजी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. याशिवाय साखर कारखाने, गुऱ्हाळ अशा १२१ ठिकाणांचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी मोहीम राबवली जाते. त्यात शाळाबाह्य मुलेही आढळतात. परंतु काही दिवस शाळेत आल्यानंतर पालकांचे स्थलांतर झाल्यास ही मुले परत दुसऱ्या गावी जातात.