श्रमदानातून गाळ काढताना कुंडात सापडली 'थ्री नॉट थ्री' ची ९० काडतूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 03:34 PM2019-05-08T15:34:38+5:302019-05-08T15:39:10+5:30
नक्षलवाद्यांनी काडतुसे फेकल्याचा संशय
श्रीक्षेत्र माहूर (जि़नांदेड) : ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकसहभागातून शहरातील मातृतीर्थ कुंड परिसरात गाळ काढण्याचे काम सुरू आहे़ हा गाळ काढताना जागमाता कुंडात ९० काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ ही काडतुसे २० वर्षापूर्वीची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
शहरातील मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रोडवर जागमाता (वृनमोचन कुंड) येथे मागील दीड महिन्यापासून लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे़ कुंडातील १३ पायऱ्या गाळमुक्त झाल्यानंतर बुधवारी १४ व्या पायऱ्याखालचा गाळ उपसण्यात येत असताना सकाळी १०़३० च्या सुमारास ही काडतूस सापडली. काडतूस पाहिल्यानंतर नागरिकांत एकच खळबळ उडाली.
काहींनी या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पो़नि़लक्षमण राख यांनी कुंडाकडे धाव घेतली़ यावेळी सर्व काडतूस स्वच्छ करून मोजणी केली असता ७३ पूर्ण काडतुस तर १७ अर्धवट तुटलेल्या अवस्थेतील थ्री नॉट थ्रीचे काडतुस आढळून आले़ ही सर्व ९० काडतुसे पोलिसांनी ताब्यात घेतली असून याचा पंचनामा करण्यात आला़ सदरील काडतुस वरिष्ठांकडे तात्काळ पाठविणार आहेत़ कुंडातील गाळ काढण्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू असल्याचे पोलिस निरीक्षकलक्षमण राख यांनी सांगितले़
नक्षलवाद्यांनी काडतुसे फेकल्याचा संशय
आदिवासीबहुल असलेल्या माहूर-किनवट तालुक्यात २० वर्षापूर्वी नक्षली चळवळीचा बोलबाला होता़ या भागातील नक्षलींचा नेता म्हणून ओळख असलेल्या श्यामराव कनाके उर्फ विजयकुमार यास १८ मे १९९२ रोजी जुनापाणी येथे मारण्यात आले़ त्यानंतर या भागातील नक्षली चळवळीची चर्चाही थांबली़ विजयकुमार मारल्या गेल्यानंतर त्याचे साथीदार मात्र फरार झाले़ नक्षल्यांच्या जाण्या-येण्याचा हाच मार्ग असल्याने त्यातल्याच काही जणांनी हा दारूगोळा कुंड परिसरात फेकला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे़