विष्णूपुरी प्रकल्पात ९० टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:56 AM2018-07-22T00:56:02+5:302018-07-22T00:56:23+5:30
विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळपास २६ टक्के भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विष्णूपुरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा येवा काहीअंशी घटला असला तरी प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात. तर इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून हा प्रकल्प जवळपास २६ टक्के भरला आहे.
जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांमध्ये ३५.७० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून आजघडीला जिल्ह्यात १९८ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. यामध्ये अप्पर मानार प्रकल्पात १९ टक्के तर लोअर मानार प्रकल्पात १० टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांतही ३५ दलघमी तर ८८ लघु प्रकल्पांत ५५ दलघमी साठा उपलब्ध आहे. गतवर्षी १९ जुलै रोजी जिल्ह्यात केवळ १२ टक्के म्हणजे ८४ दलघमी इतका साठा होता. तुलनेत यावर्षी चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात ९० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पाण्याचा येवा मंदावल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. मात्र कोणत्याही क्षणी जलसाठ्यात वाढ झाल्यास दरवाजे उघडावे लागतील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. परिणामी गोदावरी काठच्या गावांना तसेच नांदेड शहरालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आजघडीला ४३.६७ टक्के पाऊस झाला असून सरासरी ४१४.६९ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९५५.५५ इतकी आहे. देगलूर आणि मुखेड तालुका वगळता कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. सर्वाधिक ६७.७२ टक्के पाऊस हा मुदखेड तालुक्यात तर भोकर तालुक्यात ५७.६३, नांदेड- ५३.६६, हदगाव- ५४.९८, हिमायतनगर- ९२.८३, कंधार- ५०.२३, अर्धापूर- ५०.१०, उमरी- ४६.५३, लोहा- ४९.७८, किनवट-३१.६२, माहूर-४३.७३, बिलोली- २८.५१, धर्माबाद- ३३.३८, नायगाव तालुक्यात ३५.४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी १७.४२ टक्के पाऊस देगलूर तर मुखेड तालुक्यात २५.५८ टक्के पावसाचे प्रमाण आहे. जिल्ह्यात किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर हे सर्वाधिक पावसाचे तालुके मानले जातात. पण अद्यापही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. माहूरमध्ये ४३ तर किनवट- ३१ टक्के पाऊस झाला आहे. \
---
इसापूर प्रकल्पाकडे डोळे
जिल्ह्यातील नांदेडसह भोकर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर, हदगाव, धर्माबाद, उमरी आदी तालुक्यांना इसापूर प्रकल्पातून पाणी मिळते. गतवर्षी प्रकल्प न भरल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. यंदा हे धरण भरते की नाही ? याकडे लक्ष लागले आहे. आजघडीला प्रकल्पात १२९.४२ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. हा साठा २६ टक्के इतका आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता १२७९ दलघमी आहे. त्यातील ९४८ दलघमी जलसाठा हा उपयुक्त आहे. इसापूर धरण भरल्यास निम्म्या नांदेड जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटतो.