२६ साखर कारखान्यांकडून ९४ लाख २८ हजार टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:07+5:302021-05-21T04:19:07+5:30
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ...
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यात १८ खासगी तर आठ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. विभागाचा गाळप हंगाम ता. ३० ऑक्टोबरपासून परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर या कारखान्यापासून झाला, तर हंगामाचा शेवट ता. चार एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यातीलच बळीराजा साखर कारखान्याचा पट्टा पडून झाला.
विभागातील २६ कारखान्यांनी ९४ लाख २८ हजार १८५ टन उसाचे गाळप तर ९३ लाख ९९ हजार २६३ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली.
गाळप, उताऱ्यात ‘बळीराजा’ अव्वल, नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने हंगाम अखेर सहा लाख ७९ हजार २४६ टन उसाचे गाळप करत सात लाख ७२ हजार ५०८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर, या कारखान्याचा साखर उतारा ११.३७ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधिक आहे. यासोबतच गंगाखेड शुगर कारखान्याने चार महिन्यांत सहा लाख २८ हजार ५५७ टन उसाचे गाळप करत साखरेचे उत्पादन सहा लाख ४८ हजार ९०० क्विंटल केले आहे.
कारखानानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा...कारखाने... ऊस गाळप... साखर उत्पादन
नांदेड...सहा... १९,२४,२८९... १८,५५,७७५
लातूर...नऊ... ३१,६७,८९७... ३०,४१,१९०
परभणी...सहा.. . २८,१८,०९५.. २८,८७,९३८
हिंगोली...पाच... १५,१७,९०३... १५,६१,३६०
एकूण...२६... ९४,२८,१८५... ९३,९९,२६३
विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के